विविध मागण्यांसाठी देशातील स्वस्त धान्य दुकानदारांनी पुकारलेल्या बेमुदत बंदमध्ये इचलकरंजी शहरातील दुकानदार सहभागी झाले आहेत. त्यामुळे शहरातील १०३ रेशन दुकानदारांनी १ जानेवारी २०२४ पासून दुकाने बेमुदत बंद ठेवली आहेत. रेशन दुकानदारांच्या आंदोलनामुळे धान्य वितरण व्यवस्था ठप्प असून दुकानदार आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.
शहरात अंत्योदय रेशन कार्डाची संख्या ४ हजार ८९९ इतकी आहे
देशभरातील रेशन व्यवस्था टिकावी, ती सक्षम व्हावी तसेच २ जी बदलून ४ जी मशिन द्यावे, रेशनचे कालबाह्य नियम बदला मार्जिन मनी ३०० रुपये करा, मासिक इन्कम गॅरंटी ५० हजार करा, राष्ट्रीय अन्नसुरक्षा पात्रता निकष बदला, आनंदाचा शिधा कायमस्वरूपी सुरू ठेवा, त्यात पामतेल ऐवजी सोयाबीन, सुर्यफूल तेल द्यावे, हाताळणी लॉस वाढवून द्यावा,
आंतरराज्य पोर्टेबिलीटी धान्य वितरणाचे त्वरीत मार्जिन मिळावे, जीवनावश्यक वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करून द्यावे, आदी मागण्यांबाबत सरकार प्रतिसाद देत नाही, त्यावर चर्चा करत नाही.
त्यामुळे १ जानेवारीपासून देशभरातील रेशन दुकानदारांनी बेमुदत रेशन दुकान बंद ठेवली आहेत. त्यामध्ये देशातील ५ लाख तर राज्यातील ५३ हजार दुकाने बंद राहणार आहेत. सरकारने सकारात्मक भूमिका घेतली नाही तर १६ जानेवारी रोजी संसद भवनावर मोर्चा काढणेत येणार आहे. दरम्यान, रेशन दुकानदारांच्या मागण्यांसंदर्भात इचलकरंजी शहर रास्तभाव धान्य दुकानदार संघटनेच्यावतीने अप्पर तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.