खानापूर परिसरामध्ये पावसाने खरिपाला दणका!छाटणी पुन्हा लांबणीवर…

गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने खानापूर घाटमाथ्यावर पुन्हा हजेरी लावली. शनिवारी पहाटेच्या सुमारास घाटमाथ्यावरील खानापूर, सुलतानगादे, बेनापूर, पळशी, करंजेसह अनेक गावांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.
शनिवारी दिवसभर आकाश ढगाळ होते व परिसरामध्ये हलक्या व मध्यम स्वरूपाच्या पावसाची रिपरिप सुरू होती. काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे खरिपातील हुलगा चवळी, मूग, उडीद इत्यादी पिकांच्या काढणीचा हंगाम जोरात सुरू झाला होता.

गेल्या तीन महिन्यांपासून पडत असलेल्या सततच्या पावसामुळे व रोगट हवामानामुळे यावर्षी खरिपातील या पिकांना मोठा फटका बसला आहे. पावसामुळे या पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले असले, तरी जे काही उरले आहे ते काढून घेण्याची शेतकऱ्यांची धडपड चालू होती. निर्यातक्षम द्राक्ष बागांच्या छाटणीची शेतकऱ्यांनी तयारी सुरू केली होती. मात्र, या पावसाने छाटणी लांबणीवर पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सुलतानगादे परिसरातील काही शेतकऱ्यांनी द्राक्षबागांची आगाऊ छाटणी केली होती. या द्राक्षबागांनाही या पावसाचा फटका बसणार आहे.

शनिवारी पडलेल्या पावसाने पुन्हा एकदा बळीराजा संकटात सापडला आहे. सर्वांनाच पाऊस थांबण्याची प्रतीक्षा लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने खानापूर तालुक्यामध्ये हुलकावणी दिली होती, परंतू शनिवारी विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावली. या पावसाने खरीपाच्या पिकांचे नुकसान झाले.