रब्बी हंगामासाठी ‘टेंभू’चे आवर्तन सुरू; खानापूर, आटपाडी, सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा

खानापूर, आटपाडी, सांगोला आदी भागात पाण्यासाठी वारंवार शेतकऱ्यांची मागणी सुरु होती. टेंभूचे आवर्तन सुरु करण्यासाठी सतत मागणी होत होती. शेतकऱ्यांनी लांबणीवर पडलेल्या आवर्तनामुळे निर्माण झालेल्या तीव्र पाणी टंचाईवर सरकारकडे तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली होती. कडेगाव, खानापूर, आटपाडी, सांगोला आदी तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या पिकांना पाण्याअभावी नुकसान होऊ लागले होते.

रब्बी पिके कोमेजून जात होती. ऊस व बागायती पिकांसमोरील पाणी संकट वाढले होते.’टेंभू’च्या पाण्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशाराही दिला होता. योजनेचा टप्पा क्रमांक १ अ मधून कृष्णा नदीचे पाणी सोडले गेले. ते टप्पा क्रमांक १ ब मध्ये पोहोचवून खड्या उंचीवरून (६१ मीटर) पाणी उचलून वितरणाची प्रक्रिया सुरू झाली. त्यासाठी १९५० अश्वशक्तीचे ३३ पंप बसवले गेले आहेत. त्यानंतर, हे पाणी ८५ मीटर उचलून ६ महाकाय पाईपलाईनद्वारे खांबाळे बोगद्याच्या सुरवातीस पोहोचवले आहे.

खंबाळे औंध बोगद्याच्या माध्यमातून मुख्य कालव्यात प्रवेश करत, पाणी कडेगाव तालुक्यातील शिवाजीनगर तलावात सोडण्यात येत आहे. पाण्याचा वितरण कार्यक्रम वेगाने सुरू असून सुर्ली व कामथी कालव्यात पाणी लवकरच जाणार आहे. आशिया खंडातील सर्वांत मोठ्या टेंभू सिंचन योजनेचे रब्बी हंगामासाठी आवर्तन आज सुरू झाले. त्यामुळे सांगली, सातारा जिल्ह्यासह सोलापूर जिल्ह्यांतील सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.’टेंभू’च्या मुख्य कालव्याद्वारे योजनेचे पाणी लवकरच शिवाजीनगर तलावात पोहोचणार आहे. त्यापुढे मुख्य कालव्यातून हिंगणगाव बुद्रुक तलावात व पुढे खानापूर आटपाडी आणि सांगोल्यापर्यंत जाणार आहे. या आवर्तनामुळे लाभक्षेत्रातील ५५ हजार हेक्टर क्षेत्रातील शेतकरी व पिकांनाही दिलासा मिळाला आहे.