इचलकरंजी शहरातील दोनशे बेडच्या इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील शस्त्रक्रिया व शवविच्छेदन तसेच अन्य सांडपाण्यावर कसलीच प्रक्रिया न करता ते भुयारी गटारी मार्गाने पंचगंगा नदीत सोडण्यात येत असल्याची तक्रार करण्यात आली होती.या तक्रारीनुसार बुधवारी प्रदूषण नियंत्रण खात्याच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयाची तपासणी करून सूचना दिल्या.
सामाजिक कार्यकर्ते संतोष हत्तीकर यांनी याबाबत ई-मेलद्वारे लेखी तक्रार केली होती. यांची गंभीर दखल घेत विभागीय क्षेत्रीय अधिकारी अंकुश पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी रुग्णालयात इटीपी व एसटीपी प्लांट अस्तित्वातच नसल्याचा प्रकार उघडकीस आला. यामुळे सुधारणेची संधी देत तोंडी सूचना देण्यात आल्याचे समजते.संतोष हत्तीकर यांनी हॉस्पिटल अधीक्षक यांच्यावरच कारवाई व्हावी, अशी मागणी केली होती.
सोबत बँक गॅरंटी जप्त करा, अशीही मागणी करताना पंचगंगा नदीच्या पाण्यात विनापरवाना व बेकायदा अशुद्ध, प्रदूषित पाणी मिसळल्याने त्वचा विकार, पोटदुखी, उलटी, जुलाब आदींचा त्रास लोकांना होत असल्याचा आरोप केला. आरोग्याची काळजी घेणाऱ्या यंत्रणेचे प्रदूषित पाणी नदीत मिसळते, याकडे हॉस्पिटल दुर्लक्ष कसे करते, असा प्रश्न उपस्थित केला. अधिकाऱ्यांनी तपासणी करून रुग्णालय प्रशासनास सूचना केल्याची चर्चा सुरू होती.