इचलकरंजीतील रस्ता रुंदीकरणाची फाईल भू-संपादनमध्ये धूळ खात….

इचलकरंजी येथील वाढत्या वाहतुकीमुळे राजवाडा चौकाजवळील रस्ता रुंदीकरण करण्यासंदर्भात महापालिकेने तीन वर्षांपूर्वी भू-संपादन विभागाला निवाडा घोषित करण्यासंदर्भात पत्र दिले असताना अद्याप अंमलबजावणी केली नाही. वाहनचालकांना सांगलीकडे जाताना राजवाड्याच्या उतरतीला प्रवास करणे कठीण झालेआहे. राजवाडाजवळील अडथळा ठरणारे अतिक्रमण काही दिवसांपूर्वी महापालिकेने काढले.

मात्र, या मार्गावर अजूनही वाहतुकीला अडथळा होत आहे. विकास आराखड्यामध्ये येथील रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. रस्ता रुंदीकरण करताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंकडील १९ मिळकती काही अंशी काढावी लागणार आहेत. त्यातील दहा मिळकती या सरकारी आहेत, तर नऊ मिळकती खासगी आहेत. महापालिकेने तीन वर्षांपूर्वी भू-संपादन विभागाला जागेचे मूल्यांकन करून निवाडा जाहीर करण्याचे पत्र दिले आहे.

मात्र, तीन वर्षे लोटले तरी अद्याप निवाडा जाहीर झालेला नाही. तो प्राथमिक टप्प्यातच आहे. जोपर्यंत निवाडा जाहीर होत नाही, तोपर्यंत महापालिकेला रस्ता रुंदीकरण करता येणार नाही. त्यामुळे भू-संपादन विभागाने यामध्ये तातडीने लक्ष घालून निवाडा घोषित करावा.