विटा आणि सुळेवाडी येथील श्री रेवनसिद्ध देवांची पालखी शर्यत पार पडली. सुळेवाडी व विटा येथील श्री रेवनसिद्ध या एकाच देवाच्या दोन पालख्या सायंकाळी पाच वाजता श्री काळेश्वर मंदिरासमोर शर्यतीसाठी आल्या. त्यावेळी पाहुणे असलेल्या मूळ स्थानच्या पालखीला पाच पावले पुढे थांबण्याचा परंपरेनुसार मान दिला. सव्वा पाच ला दोन्ही पालख्यांची धावण्याची शर्यत सुरू झाली. सुरुवातीला सुळेवाडीच्या पालखीने आघाडी घेतली. परंतु दगडी पाण्याच्या टाकीजवळ विट्याच्या तरुणांनी ती रोखून धरली. त्यावेळी दोन्ही समर्थकाच झटापट झाली.
पालखी रोखणाऱ्यांना पोलिसांनी लाटीचा प्रसाद दिला. या गोंधळातच विट्याच्या पालखीने शिवाजी महाराज चौक गाठला. त्यानंतर सुळेवाडीच्या पालखीने सुटका करून घेत धाव घेतली परंतु व्यापारी संकुलाजवळ पुन्हा ती विट्याच्या तरुणांनी रोखून धरली. त्यामुळे पोलिसांनी पुन्हा सोम्य लाठीचार्ज केला.
मूळ स्थानची पालखी रोखल्याने बाजार समिती जवळ पोहोचलेल्या विट्याच्या पालखीला सुळेवाडीच्या तरुणांनी गराडा घालत रोखून धरली. तरीही विट्याच्या पालखीने मुसंडी मारून शिलंगण मैदान गाठले आणि विजयाची पताका फडकवली. रेवन सिद्धाच्या पालखीने शर्यत जिंकल्याने विटेकरांनी एकच जल्लोष केला.