इस्लामपूर हा जयंत पाटील यांचा बालेकिल्ला आहे. राष्ट्रवादीची जबाबदारी त्यांच्याकडे असल्याने जिल्ह्यासह राज्यातही संपर्क वाढवला आहे. त्यांनी सांगलीतील एका कार्यक्रमात पाटील यांच्यासह मानसिंगराव नाईक, सदाशिवराव पाटील एकाच व्यासपीठावर होते. यावेळी जयंत पाटील आणि सदाशिव पाटील यांच्यात खलबत्ते होऊन वैभव पाटील यांच्या हाती तुतारी देण्याचा निर्णय झाल्याचे समजते. शिराळा मतदारसंघात मानसिंगराव नाईक यांची उमेदवारी निश्चित आहे.
याला जयंत पाटील यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे मानसिंगराव नाईक शिवाजीराव नाईक यांची ताकद घेऊन तयारीला लागले आहेत. तासगाव मध्ये रोहित पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील काही मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलेले आहे इस्लामपूर, शिराळा, तासगाव कवठेमंकाळ, खानापूर आटपाडी मतदारसंघात पक्षाची उमेदवार निश्चित केले आहेत. तर मिरज मतदारसंघात उमेदवार चाचणीसाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत. एकूणच इस्लामपूरसह चार मतदारसंघ जिंकण्याची जयंतरावांची तयारी सुरू असलेली पहायला मिळत आहे.