काँग्रेसच्या वाट्याला दहापैकी ‘इतक्या’ जागा! हातकणंगलेसह इचलकरंजी…..

ज्या पक्षाचा विद्यमान आमदार, त्याच पक्षाला ती जागा या सूत्रानुसार काँग्रेसला विद्यमान आमदार असलेल्या चार जागांसह ‘शिरोळ’ व ‘इचलकरंजी’ या दोन जागांचा बोनस मिळण्याची शक्यता आहे.कोल्हापूर उत्तर’साठी आग्रह धरललेल्या शिवसेना ठाकरे गटाला दोन, तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला दोन, असे महाविकास आघाडीतील संभाव्य जागा वाटप निश्‍चित झाले आहे.

जिल्ह्यात विधानसभेचे दहा मतदारसंघ आहेत. यापैकी चार मतदारसंघांत काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत, तर ‘महाविकास’मधील ठाकरे गट व शरद पवार गटाकडे सध्या एकही विद्यमान आमदार नाही. २०१९ च्या निवडणुकीत विजयी झालेले ठाकरे गटाचे आमदार प्रकाश आबिटकर हे शिवसेना शिंदे गटासमवेत, तर कागलचे आमदार पालकमंत्री हसन मुश्रीफ व चंदगडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत आहेत.

याव्यतिरिक्त आमदार डॉ. विनय कोरे, प्रकाश आवाडे व राजेंद्र पाटील-यड्रावकर हे अपक्ष असले, तरी सध्या ते महायुतीसमवेत आहेत.महायुतीप्रमाणेच महाविकास आघाडीतही कोल्हापूर उत्तर’वरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. उत्तरची जागा शिवसेना ठाकरे गटाला मिळावी, असा आग्रह स्थानिक पदाधिकाऱ्यांचा आहे, त्याचप्रमाणे महायुतीतही या जागेसाठी शिवसेना शिंदे गट आक्रमक बनला आहे. शहरातील दोन्ही जागा भाजपला मिळणार नाहीत, अशी अटकळ असलेल्या भाजप नेतृत्वानेही उत्तर शिंदे सेनेला सोडण्याची तयारी दर्शवली आहे.

महाविकास’मध्ये विद्यमान आमदार असल्याच्या जोरावर ही जागा कोणत्याही परिस्थितीत सोडायची नाही, असे काँग्रेस नेतृत्वाने ठरवले आहे. त्यामुळेच ही जागा काँग्रेसला देण्याचा निर्णय जवळपास झाला आहे. उत्तरसह विद्यमान आमदार असलेल्या करवीर, कोल्हापूर दक्षिण व हातकणंगले या जागाही काँग्रेसला मिळतील. इचलकरंजी व शिरोळमध्ये राष्ट्रवादी शरद पवार असो किंवा शिवसेना ठाकरे गटाकडे प्रबळ उमेदवारच नाही, त्यामुळे या दोन जागांचा बोनसही काँग्रेसला मिळणार आहे.