मा.आम.जयंत पाटील यांची नवी खेळी! कितपत ठरणार यशस्वी?

सांगली मिरज कुपवाड महापालिकेत जयंत पाटील यांची काँग्रेसपेक्षा अधिक ताकद आहे. वेळोवेळी त्यांनी ती दाखवूनही दिलेली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून सध्या राज्याच्या महाविकास आघाडीतील जागा वाटपात त्यांची भूमिका महत्त्वाची आहे.

अशातच त्यांनी मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसला सांगलीत धक्के देण्यास सुरुवात केलेली आहे. काँग्रेसचे माजी नगरसेवक अभिजीत भोसले यांना खेचल्यानंतर आता आणखी काही नगरसेवक खेचण्याची तयारी त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे.

दुसरीकडे सांगली विधानसभा मतदारसंघावर याच ताकदीनुसार दावेदारी केली जाणार असून जयंत रावांची ही नवी खेळी कितपत यशस्वी ठरणार याची चर्चा राजकीय गोटात चांगलीच रंगलेली आहे. सांगलीत ही खेचाखेची नवी नाही. मात्र सध्या सांगलीच्या जागेवर काँग्रेस अंतर्गत गटबाजीला उधान आले असतानाच ही रस्सीखेच सुरू झाल्याने काँग्रेस पदाधिकाऱ्यांना धक्का बसला आहे. जास्त नगरसेवक कोणाकडे यावरही ताकदीचे प्रदर्शन केले जात असल्याने या गोष्टीला महत्त्व प्राप्त झालेले आहे.