इस्लामपूर आष्टा रस्त्यावर गाताडवाडी फाटा येथे दुचाकी व चारचाकी यांची समोरासमोर धडक होऊन आष्टा येथील अनिल बापूसो सरडे (वय ४७) व धनाजी शंकर यादव (वय ५० दोघेही रा. केशवनाथ गल्ली, आष्टा) या बांधकाम कामगारांचा मृत्यू झाला. दोघेही नाईकला यात्रेकरिता दुचाकीवरून चालले होते. याबाबत घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी, गुरुवार दि. ३ एप्रिल रोजी सायंकाळी साडे पाच वाजणेच्या सुमारास अनिल बापूसो सरडे व धनाजी शंकर यादव हे बांधकाम कामगार हे दुचाकी हिरो एव एफ डीलक्स क्र. एम. एच. १० बी. टी. १६९५ वरून नाईकबा यात्रेनिमित्त चालले होते.
गाताडवाडी फाटा या ठिकाणी आले असता, इस्लामपूरहून आष्ट्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकी क्र. एम.एच. १२ यु.एस. ०३१८ ने जोरात धडक दिली. यात अनिल बापूसो सरडे हे जागीच ठार झाले, तर जखमी धनाजी यादव यांना सांगली शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यासाठी नेताना रस्त्यातच मयत झाले. मयत अनिल सरडे हे भावई उत्सवात आळूमळू या खेळाचे मानकरी होते. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू होती.
आष्टा इस्लामपूर रोडवर आठ दिवसात हा दुसरा अपघात झाला. २६ मार्च रोजी मोटरसायकल व खडी वाहतूक करणारा डंपर यांच्यात झालेल्या अपघातात कुंडलवाडी येथील एकाच कुटुंबातील पती, पत्नी, दोन मुले असे चारजण ठार झाले होते. आज गाताडवाडी येथे झालेल्या अपघातात आष्टा येथील दोघे जण ठार झाले. त्यामुळे आष्टा इस्लामपूर रस्ता मुत्यूचा सापळा बनला आहे.
