राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटाचे नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddique ) यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली आहे. बिश्नोई गँगकडूनच सलमान खानला मागच्या अनेक दिवसांपासून जीवे मारण्याची धमकी दिली जातेय. अशा परिस्थितीत बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतरच सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली असून त्याच्या घरापासून फार्म हाऊसपर्यंत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
सलमान खानला यापूर्वी Y+ श्रेणी सुरक्षा देण्यात आली होती जी आता अपग्रेड करण्यात आली आहे. त्याची हीच सुरक्षा आणखी कडक करण्यात आल्याचीही माहिती सध्या समोर येत आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, सलमान खानच्या सुरक्षेत आता पोलिसांच्या एस्कॉर्ट कारचा समावेश करण्यात आला आहे. जेव्हा सलमान घराबाहेर पडेल त्यावेळी ही कार त्याच्यासोबत असेल. सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
त्याच्या घराबाहेर पोलीस कडेकोट बंदोबस्तामध्ये आहेत. माध्यमांनाही त्याच्या घराजवळ परवानगी नाकारण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सलमानच्या पनवेल फार्म हाऊसची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. फार्म हाऊसच्या आत आणि बाहेर पोलीस तैनात करण्यात आलेत. याशिवाय या फार्म हाऊसकडे जाणारा रस्ताही बंद करण्यात आला आहे.रिपोर्टनुसार, ससलमान खान कुठेही शूटिंगसाठी जाईल, स्थानिक पोलीस स्टेशनला त्याची माहिती दिली जाईल. त्यानंतर पोलिसांची टीम शूटिंगच्या ठिकाणी पोहोचेल आणि त्याच्या सुरक्षेची काळजी घेईल.