गेल्या अडीच वर्षापासून क्षीरसागर यांनी कोल्हापूर शहरात कामाचा धडाका लावला आहे. कोट्यावधी रुपयांचा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मंजूर करून कोल्हापूरचे नवे विकासपर्व सुरु केले आहे.कोल्हापूर जिल्ह्याचा झपाट्याने विस्तार होत असून, औद्योगिक, व्यापार, बांधकाम, कृषी या क्षेत्रातील सुरु असणारी घोडदौड त्यानुषंगाने सामाजिक, वैचारिक, राजकीय, सांस्कृतिक अभिसरण या सर्वांचा विचार करता विविध संघटनांच्या सामुहिक बैठका, विचारांचे अदान-प्रदान, सांस्कृतिक देवाण-घेवाण याकरिता एखादा जाहीर कार्यक्रम, बैठक, पत्रकार परिषद आयोजित करण्यासाठी शासनाचे अधिकृत कोणतेही केंद्र जिल्ह्यात उपलब्ध नाही. यामुळे विचारांचे आदान- प्रदान, सांस्कृतिक देवाण-घेवाण यावर मर्यादा येत आहेत. यामुळे अपेक्षित असणारी विकास प्रक्रिया गतिमान करताना अडथळे निर्माण होत आहेत.
ही उणीव दूर करण्याच्या हेतून कोल्हापूर जिल्ह्याच्या केंद्रस्थानी कोल्हापूर शहरात Convention Center (परिषद केंद्र) निर्मिती करावी, अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दि.०९ जानेवारी २०२३ रोजी लेखी पत्राद्वारे केली होती. याबाबत तपासून अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नियोजन विभागाच्या प्रधान सचिवांना दिले होते. त्यानुसार नियोजन विभागाकडून अत्याधुनिक नॅशनल कन्व्हेंशन सेंटर उभारण्यासंदर्भातील प्रस्ताव शासन स्तरावर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अत्याधुनिक नॅशनल कन्व्हेंशन सेंटर उभारण्यासाठी राजाराम तलाव येथील जागा प्रस्तावित केली आहे.
यासंदर्भात कोल्हापूर मध्ये राजाराम तलावाच्या बाजूला कन्व्हेन्शन सेंटर उभारण्याबाबत सह्याद्री अतिथी गृह, मलबार हिल, मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीमध्ये दोन हजार प्रेषक क्षमतेचे अत्याधुनिक नॅशनल कन्व्हेंशन सेंटर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानंतर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी गेल्या आठवड्यात पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या अर्थसंकल्पात कन्व्हेन्शन सेंटरसाठी निधीची तरतूद होण्याची मागणी केली होती.
यावेळी आगामी अर्थसंकल्पात यासाठी निधीची तरतूद करण्याची ग्वाही मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी राजेश क्षीरसागर यांना दिली होती. राजेश क्षीरसागर यांनी केलेल्या पाठपुराव्यास यश मिळाले होते. कोल्हापूर शहरातील राजाराम तलावाकाठी अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यास अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली होती. यानंतर कन्व्हेक्शन सेंटरची प्रक्रिया शासकीय पातळीवर सुरु होती. परंतु, कन्व्हेक्शन सेंटरचे काम आचार संहितेमुळे लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली असताना राजेश क्षीरसागर यांनी काल थेट मुंबई गाठून आज आचारसंहितेच्या पूर्वीच या कामाची प्रशासकीय मंजुरी घेवून पुन्हा एक मास्टर स्ट्रोक लगावला.