हुपरीतील सोनारास घरफोडीप्रकरणी अटक! ३५ तोळे सोन्यासह दिड लाखाची रोकड लंपास….

इचलकरंजी येथील कागवाडे मळ्यातील घरफोडीतील सोन्याचे दागिने खरेदी प्रकरणी हुपरी येथील शुभम शिवाजी पाटील (वय २५) या सोनारला गावभाग पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. कागवाडे मळा परिसरातील अरविंद काबरा यांच्या बंद घराचे कुलूप उचकटून चोरट्यांनी चांदीचे पैंजण, ब्रेसलेट, मंगळसुत्र, गंठणसह ३५ तोळे सोन्याचे दागिने आणि दिड लाखाची रोकड लंपास केली होती.

याप्रकरणी गावभाग पोलिस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकाने बजरंग चौधरी आणि रियाज कुंचनुर या दोघांना अटक केली होती. त्यांच्याकडे केलेल्या तपासात चोरीचे दागिने हुपरी येथील सोनार शुभम पाटील याला विकल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र घटनेपासून पाटील हा फरार झाला होता. अखेर त्याला अटक करण्यात आली आहे.