केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केलेल्या इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे आणि भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्या समर्थकांमध्ये अजूनही मनोमिलन झालेलं नाही. इचलकरंजीमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा होत आहे. मात्र, या दौऱ्यापूर्वीच भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. इतकेच नव्हे तर आमदार प्रकाश आवाडे यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केल्यानंतरही इचलकरंजी भाजपकडून आमदार आवाडे अजूनही बेदखल असल्याचे समोर आलं आहे. आज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत होत असलेल्या मेळाव्याला आमदार प्रकाश आव्हाडे यांना आमंत्रण देण्यात आलेलं नाही. त्यामुळे राजकीय भूवया उंचावल्या आहेत.
कोल्हापूरमध्ये भाजपचा पश्चिम महाराष्ट्राचा मेळावा पार पडला होता. या मेळाव्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये आवाडे पिता पुत्रांनी भाजप प्रवेश केला होता. व्यासपीठावर सुरेश हळवणकर हेच राहुल आवाडे आणि आमदार प्रकाश आवाडे यांना घेऊन आले होते. त्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये मनोमिलन झालं असेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली होती. मात्र गेल्या महिनाभरापासून आवाडे यांचा पक्षप्रवेश झाला असला, तरी त्यांचा अजून स्वागत मात्र काही करण्यात आलेलं नाही. त्यामुळे आवाडे भाजपमध्ये आले तरी, दोन्ही गटाच्या समर्थकांमध्ये नाराजी कायम आहे.