Anandacha Shidha : आचारसंहितेतही मिळणार आनंदाचा शिधा

विधानसभेची आचारसंहिता लागू झाल्याने रेशन दुकानातून आनंदाचा शिधा मिळणार का, असा संभ्रम नागरिकांमध्ये होता. मात्र आनंदाच्या शिधाची पिशवी वगळून शिधामधील संपूर्ण रेशन लाभार्थींना मिळणार असल्याचे पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.सणासुदीत रेशन कार्डधारकांना शासनाकडून केवळ शंभर रुपयात आनंदाचा शिधा दिला जातो.यामध्ये १ किलो साखर, १ किलो तेल, १ किलो रवा व १ किलो हरभराडाळीचा समावेश आहे. गणेश चतुर्थी निमित्त नागरिकांना आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय शासनाने घेतला. परंतु प्रत्यक्षात गणेश उत्सव झाल्यानंतर आनंदाचा शिधा प्राप्त झाला आहे. त्यामुळे या उत्सवाचा शिधावाटप सुरू असतानाच मंगळवारी (ता. १५) विधानसभेची आचारसंहिता लागू झाली.

पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे फोटो असलेल्या पिशवीमध्ये आनंदाचा शिधावाटप केला जातो. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने हा शिधावाटप होईल का असा संभ्रम नागरिकांमध्ये निर्माण झाला होता. परंतु यावर पर्याय काढत त्या राजकीय पिशवीविनाच कार्डधारकांना शिधामधील साहित्य देण्यास काही हरकत नसल्याचे स्पष्टीकरण पुरवठा विभागाकडून देण्यात आले आहे.