शेतकऱ्यांना उद्धवस्त करणारा शक्तीपीठ महामार्ग (Shaktipeeth Highway) होऊ देणार नाही, अशी आक्रमक भूमिका शेतकरी संघर्ष समितीने घेतली आहे. या महामार्गाची गरजच काय? असा सवाल करीत प्रस्तावित महामार्ग त्वरित रद्द करावा, अशी एकमुखी मागणी येथे बाधित शेतकऱ्यांनी केली. यासाठी १ जुलै रोजी कोल्हापूर -सोलापूर मार्गावर अनकढाळ (ता. सांगोला) येथे महामार्ग रोको आंदोलन होणार असल्याने माहिती संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड . सचिन देशमुख यांनी दिला आहे.
प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा यासाठी शेवटपर्यंत संघर्ष करण्याचा निर्धार करून सांगोला तालुक्यात शेतकरी संघर्ष समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या वतीने येथे आयोजित पत्रकार परिषेदेत संघटनेचे अध्यक्ष ॲड .सचिन देशमुख यांनी भूमिका मांडली . ॲड . देशमुख म्हणाले की , शेतकरी संघर्ष समिती ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही. सध्या शक्तीपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांवर लादला जात आहे. या महामार्गाच्या सरकारच्या धोरणांना आमचा ठाम विरोध आहे. नागपूर -रत्नागिरी महामार्ग आधीच अस्तित्वात असताना हा नवीन महामार्ग माथी मारण्यात येत आहे. दुष्काळी सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांची उपजीविका या महामार्गामुळे धोक्यात येणार आहे, असे ॲड . देशमुख यांनी सांगितले .
या भागात पाझर तलाव , नालाबांधणी यासाठी अगोदरच मोठ्या प्रमाणावर जमिनी घेतल्या आहेत. आता. उत्पन्न देणाऱ्या शेतीच्या जमिनीही शक्तीपीठ महामार्गासाठी सरकार काढून घेत आहे. या महामार्गामुळे आम्ही भूमिहीन होणार आहोत . शेतकऱ्यांना उद्धवस्त करणाऱ्या या महामार्गाची कसलीही आवश्यकता नसल्याने तो रद्दच झाला पाहिजे . यासाठी १ जुलै रोजी महामार्ग रोको आणि त्यानंतर आणखी आक्रमक आंदोलने छेडणार असल्याचेही ॲड . देशमुख यांनी नमूद केले.
