ऊर्जा विभागाकडून विद्युत शुल्क माफीस पात्र असलेल्या उदयोग घटकांना सवलत देणे बंद केले होते, त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच नविन उद्योग अडचणीत असताना त्यांच्या हक्काची व मंजूर असलेली विद्युत शुल्क माफी त्यांना मिळणे गरजेचे आहे. त्याबाबत काही कार्यालयीन त्रुटी असतील तर त्या दुरुस्त होऊन उद्योजकांना तातडीने विद्युत शुल्क माफीची सवलत मिळावी यासाठी आपण शासन दरबारी प्रयत्न करावेत अशी मागणी निवेदनात केली होती, त्याचा पाठपुरावा श्री माने यांनी केला होता.
उद्योग विभागाची सामूहिक प्रोत्साहन योजना-२०१९ अंतर्गत पात्र उद्योग घटकांना विद्युत शुल्क माफीचा लाभ देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता, या कामी शासन दरबारी प्रयत्न करावेत अशी मागणी इचलकरंजी शटललेस लूम ओनर्स असोसिएशन (इस्लो) यांचे वतीने अध्यक्ष गोरखनाथ सावंत यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र माने यांच्या कडे केली होती, त्यानुसार श्री माने यांनी शासन दरबारी प्रयत्न केले होते त्यांच्या प्रयत्नाला यश आले.
यासंदर्भात शासन आदेश जाहीर झाल्यानंतर असोसिएशनच्या वतीने शिवसेना जिल्हा प्रमुख रविंद्र माने यांचा सत्कार करण्यात आला.या माध्यमातून महिन्याला २ कोटींची सवलत मिळणार असल्याचेही सांगण्यात आले. या निर्णयामुळे उद्योजकांत समाधानाचे वातावरण पसरले असून याचा लाभ अनेक उद्योजकांना मिळणार आहे.