इस्लामपूर विधानसभ मतदारसंघात जयंत पाटील यांच्या विरोधात उमेदवार कोण याची कोंडी आज अखेर फुटलेली नाही. गेल्या दोन दिवसापुर्वी हा मतदारसंघ राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाला गेल्याच्या चर्चा सुरु झाल्या. भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांना मुंबईला बोलावून घेवून त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश करत उमेदवारी देण्याचे ठरले. निशिकांत पाटील मुंबईत दाखल झाले, मात्र प्रवेश थांबला, त्यानंतर सोमवारी हुतात्मा संकुलाचे नेते गौरव नायकवडी यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने मुंबईला बोलावून घेतले. त्यामुळे जयंत पाटलांच्या विरोधात उमेदवार कोण याबाबत मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे.
उद्यापर्यंत उमेदवार निश्चित होतील, मात्र कोणत्या पक्षाला ही जागा जाणार या बाबत संभ्रमावस्था कायम आहे. जयंत पाटलांच्या विरोधात २०१९ ला गौरव नायकवडी व निशिकांत पाटील यांनी निवडणूक लढवल्यामुळे विरोधकांची मते विभागून जयंतरावांना निवडणूक सोपी झाली. या सर्व घडामोडींचा राजकीय नेत्यांनी आढावा घेवून २०२४ ला जयंत पाटलांच्या विरोधात एकच उमेदवार द्यायचा असे निश्चित करुन निशिकांत पाटील यांना तयारीला लागण्याचे संकेत दिले होते. मात्र निवडणूकीची घोषणा झाली आणि परत एकदा इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ जयंत पाटलांच्या विरोधात कोण लढवणार या बाबत वेगवेगळे इच्छुक तयार झाले.
गौरव नायकवडी, आनंदराव पवार यांनी शिवसेना शिंदे गटाकडून मागणी केली आहे. निशिकांत पाटील यांनी भाजपाकडून मागणी केली आहे.राष्ट्रवादी, भाजप व शिवसेना यांच्या फाॅर्मुल्यानुसार ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा विद्यमान आमदार असेल ती जागा संबंधितांना दिली जाईल अशी प्राथमिक बोलणी होती. त्यानुसार या जागेसाठी राष्ट्रवादीकडून अजीत पवार आग्रही राहीले. तशा हालचालीही सुरु झाल्या. गेल्या चार दिवसापुर्वी निशिकांत पाटील यांना मुंबईला बोलावून घेत राष्ट्रवादी अजीतदादा पवार गटात प्रवेश देवून त्यांची उमेदवारी निश्चित होईल अशा हालचाली सुरु झाल्या.
निशिकांत पाटील मुंबईत पोहचले. रात्री प्रवेश होणार व उमेदवारीची घोषणा होईल अशा चर्चा सुरु झाल्या. मात्र भाजपाने या जागेवर पुन्हा एकदा दावा सांगितला. त्यामुळे निशिकांत पाटील यांचा प्रवेश थांबला. परत एकदा भाजपाकडून निशिकांत पाटील यांना उमेदवारीची शक्यता निर्माण झाली. या सर्व घडामोडीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा ही जागा आम्ही लढवणार असा दावा सांगून गौरव नायकवडी यांना मुंबईत बोलावून घेतले. त्यामुळे जयंत पाटलांच्या विरोधात उमेदवार कोण ? यात आता मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे