Ichalkaranji Crime : इन्स्टाग्रामवर मेसेज केल्याच्या कारणावरून इचलकरंजीत तणाव! दहशत माजवणाऱ्यांना…..

सध्या अनेक भागात गुन्हेगारी प्रकारात खूपच वाढ झालेली आहे. खून, मारामारी, अपघात दिवसेंदिवस वाढतच आहेत. इचलकरंजी शहरात देखील या प्रकारात वाढ झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. इन्स्टाग्रामवर मेसेज केल्याच्या कारणावरून शेळके मळा परिसरात तणाव निर्माण झाला. दोघांनी एकाला मारहाण केली, तर तलवारीसह दहशत माजवत जीवे मारण्याची धमकी देऊन महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी अटक केलेल्या सहा जणांना पोलिसांनी घटनास्थळी तपासासाठी फिरवले.

सागर लक्ष्मण गायकवाड (वय २०), समीर अल्लाबक्ष मणेर (१९, दोघे रा. साखरपे हॉस्पिटलजवळ, पोवार गल्ली), पार्थ प्रवीण कांबळे (१९, रा कामगार चाळ), वैभव दिलीप कांबळे (२४, रा. दाते मळा), अविनाश रमेश कदम (२१, रा. शेळके मळा) आणि श्रेयश पोळ अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. शेळके मळा परिसरातील श्रेयश दीपक पोळ (२१) याने इन्स्टाग्रामवर संदेश केला. या कारणावरून संजय माने आणि संजय परीट या दोघांनी पोळ याला मंगळवारी (ता.२५) दुपारी घरी बोलावून घेऊन शिवीगाळ केली आणि लाकडी बॅटने मारहाण केली.

तसेच माने याने पोळ याच्या डोक्यात, पाठीवर, छातीवर नखाने ओरबाडले. याप्रकरणी पोळ याच्या फिर्यादीनुसार माने आणि परीट या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सायंकाळी श्रेयश पोळ याच्यासह पाच जण तलवार, काठ्या घेऊन दुचाकीवरून शेळके मळ्यात गेले.

यावेळी पीडित महिलेच्या घरासमोर जाऊन तिच्या पतीस जीवे मारण्याची धमकी दिली. तिथे असलेल्या पाणीपुरी गाड्याची नासधूस करत विद्युत मीटरचीही काच फोडली आणि महिलेस लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. घरावर दगडफेक करत दहशत माजवली. याप्रकरणी पोळ याच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल केला.