हॉटेल, बार, दारू दुकाने रात्री ११ ला बंद!

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील हॉटेल, बार, दारू दुकाने, परमीट रूम, धाबे रात्री ११ वाजता बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासाने दिले आहेत.निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी याबाबतचे आदेश जिल्ह्यात लागू केले. त्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर फौजदारी कारवाई करण्यात येईल.

निवडणूक कालावधीत मतदारांना आमिषे दाखविण्याकरीता मोठ्या प्रमाणात दारूचे वाटप व जेवणावळींचे आयोजन केले जाते. बऱ्याच वेळा सांकेतिक चिन्ह, शब्द यांचा वापर करून परस्पर मतदार, कार्यकर्ते यांची हॉटेल, बार, परमिट रुम याठिकाणी मोठ्या प्रमाणात सोय केली जाते. तेथे कार्यकर्त्यांत व गटागटांमध्ये संघर्ष किंवा वादावादी होऊन मारामारी होण्याची शक्यता असते.

अशा ठिकाणी गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक, राजकीय गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक, समाज विघातक प्रवृत्ती यांचा मोठ्या प्रमाणात वावर होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होते. आदर्श आचारसंहितेवर विपरित परिणाम होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे हे निर्बंध लागू केले आहेत.

निर्बंध असे
सार्वजनिक ठिकाणी लाऊड स्पिकरचा वापर पोलिसांच्या परवानगगीनेच
रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत ध्वनीक्षेपक यंत्रणा वापरता येणार नाही
देशाची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा आचारसंहितेचा भंग होईल असे भाषण केल्यास, सोशल मीडिया पोस्ट टाकल्यास कारवाई
विनापरवाना शस्त्राचा वापर, बेहिशोबी रक्कम यावरही कारवाई