विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर होण्याच्या प्रक्रियेने गती घेतली असताना महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये बंडाचे झेंडे रोवले जात आहेत. इचलकरंजी व चंदगड मध्ये दोन्हीकडे तर कोल्हापूर उत्तर, करवीर, हातकणंगले येथे एका पक्षात बंडखोरी निश्चित असून ती रोखने दोन्ही आघाड्यांसमोर आव्हान असणार आहे. कोल्हापूर उत्तर मध्ये काँग्रेसला उमेदवारी देण्याला शिवसेना – राष्ट्रवादीने विरोध केल्याने मविआ अंतर्गत वारे तापले आहे.
याची परिणीती बंडखोरीत होण्याची शक्यता वाढली आहे. करवीर मध्ये एकनाथ शिंदे यांचे समर्थक माजी आमदार चंद्रजीत नरके आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे विनय कोरे यांच्यात कमालीची चुरस असून याचे पर्यवसन बंडखोरीत होणार असे दिसत आहे. हातकणंगले राखीव मध्ये आमदार राजू आवळे यांना उमेदवारी मिळण्याचे संकेत असताना उद्धव ठाकरे सेनेचे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी सवतासुभा मांडण्याचे डावपेच सुरु केले आहेत. यामुळे जिल्ह्यातील निम्म्या मतदारसंघात बंडखोरीचे झेंडे रोवले जात असून हे प्रमाण वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.