आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदारसंघांमध्ये जोरदार हालचाली सुरू झालेल्या आहेत. आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात देखील झालेली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर होण्याच्या प्रक्रियेने गती घेतली असताना महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये बंडाचे झेंडे रोवले जात आहेत. इचलकरंजी व चंदगड मध्ये दोन्हीकडे तर कोल्हापूर उत्तर, करवीर, हातकणंगले येथे एका पक्षात बंडखोरी निश्चित असून ती रोखाने दोन्ही आघाड्यांसमोर आव्हान असणार आहे.
भाजपच्या पहिल्या यादीत कोल्हापूर दक्षिण मध्ये माजी आमदार अमल महाडिक तर इचलकरंजीत राहुल आवाडे यांचा समावेश आहे. आवाडे यांना उमेदवारी मिळणार हे गृहीत धरून भाजपमधील एक गट नाराज होता. याची चुणूक प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित झालेल्या मेळाव्यात दिसली. त्यांची पाठ वळताच माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके यांनी आवाडे यांच्या उमेदवारीला विरोध करीत अपक्ष म्हणून लढण्याची घोषणा केल्याने भाजपमधील पहिली बंडखोरी पुढे आली. शुक्रवारी भाजप कार्यालयात आवाडे पिता पुत्रांच्या प्रवेशावेळी माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी शेळके यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.
आवाडे यांच्या उमेदवारीबाबत एक वर्ग पडद्याआडून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने वा राष्ट्रवादीचे महानगर अध्यक्ष विठ्ठल चोपडे यांना पाठबळ देण्याची शक्यता आहे. एकूणच नाराज बंडखोरीचा झेंडा हाती घेतील अशा हालचाली आहेत. याच मतदारसंघात शरद पवार राष्ट्रवादीकडून मदन कारंडे तर काँग्रेस कडून शहराध्यक्ष संजय कांबळे यांनी उमेदवारीचा प्रबळ दावा केला असताना संजय तेलनाडे यांची बंडखोरी अटळ मानली जात आहे.