प्रकाश आवाडेंची मोठी घोषणा! आवाडे घराण्यातील…..

भाजपच्या वतीने इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून राहूल आवाडे यांना उमेदवारी दिल्यानंतर आज त्यांच्यासह आमदार आवाडे यांचे भाजप शहर कार्यालयात जल्लोषी वातावरणात स्वागत करण्यात आले. राहूल आवाडे यांना उच्चांकी मताधिक्क्यांनी निवडून आणण्याचा निर्धार माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी हात उंचावून केला. हाळवणकर म्हणाले, भाजपचे कार्यालय हे कार्यकर्त्यांच्या कष्टातून उभे राहिलेले मंदिर आहे. त्यामुळे या निवडणुकीत कष्ट करणा-या कार्यकर्त्यांना महापालिका निवडणुकीत संधी द्यावी लागेल. त्यांना वा-यावर सोडले जावू नये.

आवाडे हे पाच वर्षे सत्ता असतांनाही व नसतांनाही भाजपशी एकनिष्ठ राहिले आहेत. आता भाजपचे संघटन आणि आवाडे गट एकत्र झाल्यामुळे आता पुढील निवडणुकांत सर्वत्र भाजपचा झेंडा फडकणार असून विरोधकांचे अनामतही राहणार नाही. आमदार आवाडे म्हणाले, भाजप कार्यालयात प्रवेश करताना मन भरुन आले आहे.

यापुढे भाजपसाठी काहीही असेच आमचे धोरण असणार आहे. राहूल यांना निवडून आणण्याची जबाबदारी आता कार्यकर्त्यांची असणार आहे. हाळवणकर व मला अन्य मतदार संघ सांभाळावे लागणार आहेत. मी तुमचा सहकारी असून भाजपची शिस्त आम्हाला माहिती आहे. यापुढेही भाजपसोबत प्रामाणिकपणे राहणार आहे. सर्व संस्थांवर आता भाजपचाच झेंडा दिसेल.

आता आम्ही भाजपवासिय झालो आहोत. नेते नव्हे तर कार्यकर्ते आहोत. कार्यकर्त्यांना यापुढे बळ देण्याची आमची जबाबदारी असणार आहे. बोट दाखवाल त्या कार्यकर्त्याला महापालिका निवडणुकीत संधी दिली जाईल. त्यामुळे महापालिकेत भाजपचाच महापौर असणार आहे. पण, या पदावर आवाडे घराण्यातील कोणीही असणार नाही, अशी घोषणा आमदार प्रकाश आवाडे यांनी येथे केली.