महायुतीच्या अस्तित्वाची तर महाआघाडीच्या प्रतिष्ठेची लढाई

लोकसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यातील सहा विधानसभा सांगली आणि दोन विधानसभा हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये केवळ जत विधानसभेचा अपवाद वगळता उर्वरित सात विधानसभेत महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील व काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांना मताधिक्य मिळाले. विशेष म्हणजे भाजपचे विद्यमान आमदार असलेले सांगली, मिरज आणि शिंदेसेनेकडे असलेल्या खानापूर मतदारसंघातही 16 ते 24 हजारांचे मताधिक्य विरोधी पक्षाला मिळाले. त्यामुळे सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार व माजी खासदार संजय पाटील यांचा पराभव झाला.

आगामी विधानसभा निवडणुकीत लोकसभेचे समीकरण कायम राहणार नाहीत तरीही सांगली जिल्ह्यातील महायुतीकडे असलेल्या या तिन्ही विधानसभा मतदारसंघातील लोकसभेचे मताधिक्य मागे टाकण्याचे आवाहन महायुतीच्या जिल्ह्यातील नेत्यांपुढे आहे. लोकसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यात महाविकास आघाडीचे नेते जयंत पाटील व विश्वजीत कदम यांचा आत्मविश्वास वाढला. त्यामुळे महायुतीकडे असलेले जिल्ह्यातील सांगली, मिरज व खानापूर हे तिन्ही विधानसभा मतदारसंघ मिळवण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. मात्र या तिन्ही मतदारसंघातील वर्चस्व कायम ठेवण्याचे आवाहन महायुतीचे जिल्ह्यातील पालकमंत्री सुरेश खाडे व आमदार सुधीर गाडगीळ यांच्या पुढे आहे.