सांगोल्याची जागा जर लढवणार नसेल, तर शेकाप कोणतीच जागा लढवणार नाही. आम्ही आमचे अधिकार शरद पवार यांना दिले आहेत. त्यांनीच सांगितले आहे की, सांगोल्यात आमचा पाठिंबा शेकापला राहील. त्यामुळे ते सांगतील त्याप्रमाणे होईल. महाविकास आघाडीचे दोन उमेदवार नसतील. आम्ही महाविकास आघाडीतच राहणार आहोत असं स्पष्टीकरण शेकापचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांनी सांगोल्यात दिलं.
सांगोला विधानसभेसाठी शेकापकडून स्व. गणपत आबांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांना अधिकृत उमेदवारी शेकापचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जाहीर केली. यावेळी ते बोलत होते. जयंत पाटील पुढे म्हणाले, शहाजी बापूंचे बजेट मोठे असणार आहे. आम्ही पैशाला पुरे पडणार नाही. यावेळी डॉ. बाबासाहेब देशमुख म्हणाले, आबासाहेबांच्या पश्चात नेतेमंडळी आमची चेष्टा करीत होती. त्यांचे विचार निष्ठा सोडून नेते मंडळी इकडून तिकडून गेली. मात्र, ज्याला लढायचे आहे. त्यांनी तिरंगी, चौरंगी, पंचरंगी लढावे. केवळ कोणीही डरकाळ्या फोडू नये, रिंगणात उतरावे.
डॉ. अनिकेत देशमुख म्हणाले, आम्हा देशमुख कुटुंबात वादच नव्हता. विरोधकाकडून आमच्यात मतभेद असल्याचा प्रयत्न केला. आम्हाला आमिषे दाखवली गेली परंतु आबासाहेबांनी कार्यकर्त्यांची बांधलेली मोळी आम्ही दोघे सहजासहजी सोडणार नाही. समोर कोण आहे याची चिंता आम्हाला नाही.