सांगोल्याच्या जागेवरून महाविकास आघाडीत वाद

सांगोल्याच्या जागेवरुन महाविकास आघाडीमध्ये सध्या वाद होताना दिसत आहे. सांगोल्यामधून ठाकरे गटाने दिपक आबा साळुंखे यांना उमेदवारी जाहीर केल्याने शेकापकडून डाॅ.बाबासाहेब देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शेकापच्या उमेदवाराला शरद पवार गटाचा पाठिंबा असेल, असेही बोलले जात आहे. अशातच शरद पवारांचा आशीर्वाद घेऊनच मी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला, असा मोठा गौप्यस्फोट दीपक साळुंखे यांनी केला आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीतून शेकापला सुटणार म्हणत शेकापने डॉ. बाबासाहेब देशमुख यांची उमेदवारी जाहीर केली. दरम्यान, माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांना उमेदवारी जाहीर करत ‘मातोश्री’तून एबी फॉर्म मिळाल्याने सांगोल्याच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीत गोंधळ असल्याचे स्पष्ट झाले. महाविकास आघाडीतील तिढा सुटणार असे बोलले जात होते. मात्र, सांगोल्याच्या जागेवरून वाद वाढला आहे.