इचलकरंजी मतदारसंघावर देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला होता. त्यामुळे या जागेसाठी देखील जोरदार रस्सीखेच सुरू होती. अखेर हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मिळाला असून पक्षाने मदन कारंडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही आमचे नेते शरदचंद्र पवार यांच्याकडे उमेदवारी मागितली होती. त्याचबरोबर मतदारसंघात केलेला सर्वेसुद्धा आमच्या बाजूने अधिक प्रमाणात होता. पवार साहेब आणि प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आमच्या मागणीबाबत सकारात्मक प्रतिसाद देत इचलकरंजीत मतदारसंघातून जांभळे गटाला प्राधान्य देऊ अशी ग्वाही दिली होती.
मतदारसंघात जांभळे गटाची ताकद अधिक असताना पक्षाने आम्हाला डावलले आहे. ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली त्यावेळी क्षणाचाही विलंब न लावता जांभळे साहेबांनी शरदचंद्र पवार यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला. तसेच सोपवलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली होती. प्रामाणिकपणे, एकनिष्ठ काम करूनही जर डावलले जात असेल तर आम्ही आमचा निर्णय घेण्यात सक्षम आहोत. म्हणूनच आता जांभळे गटातील निष्ठावंत कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील दिशा निश्चित केली जाणार आहे आणि विधानसभा निवडणुकीसाठी अपक्ष म्हणून आम्ही अर्ज दाखल करणार आहोत असे सुहास जांभळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.