अभूतपूर्व शक्तीप्रदर्शनाने महाविकास आघाडीकडून दिपकआबांचा उमेदवारी अर्ज दाखल! राजकीय इतिहासातील रेकॉर्ड ब्रेक गर्दी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्ह्याचे नेते माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघात सांगोला तालुक्याच्या राजकीय इतिहासातील ऐतिहासिक आणि अभूतपूर्व आणि रेकॉर्डब्रेक शक्तीप्रदर्शन करून महाविकास आघाडीकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दिपकआबा साळुंखे पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सुमारे ३० ते ३५ हजार दिपकआबा प्रेमी शिवसैनिकांनी सांगोला शहरात गर्दी केली होती.

संपूर्ण विधानसभा मतदारसंघातून वाहनांचे लोंढेच्या लोंढे शहरात दाखल झाल्याने संपूर्ण सांगोला विधानसभा मतदारसंघातील रस्त्यावर ट्राफिक जाम झाल्याचे चित्र सोमवारी दिवसभर पाहायला मिळाले. प्रचंड जल्लोष ढोल ताशांचा कडकडाट आणि उत्साहात महात्मा फुले चौक येथून माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांची उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रॅली सुरू झाली. विशेष म्हणजे रॅलीतील सर्वात पुढे असणारे लोक सांगोला तहसील कार्यालयात पोहोचले तरीही रॅलीमध्ये सहभागी असणारे लोक अजूनही महात्मा फुले चौकातच होते.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि काँग्रेस यांसह मित्र पक्षाच्या वतीने महाविकास आघाडी कडून सोमवार दि २८ रोजी दिपकआबांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी बहीरप्पा माळी यांच्याकडे दाखल केला यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक प्रबुद्धचंद्र झपके घेरडी गावचे माजी सरपंच धनगर समाजाचे युवा नेते बिरा पुकळे आणि शिवसेना महिला आघाडीच्या सुरेखा सलगर आदी उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जयभवानी चौक येथे या रॅलीचे जाहीर सभेत रुपांतर झाले यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख साईनाथ अभंगराव, संभाजीराजे शिंदे, प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, शिवाजीराव बनकर, अभिषेक कांबळे, संभाजी हरिहर, तुषार इंगळे, अक्षय चोरमुले, अजित देवकते, संतोष पाटील, नवनाथ मोरे, अनिल नवत्रे, सखुबाई वाघमारे

आदींसह महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी बोलताना सांगोला तालुक्याच्या सर्वांगीण आणि सर्वसमावेशक विकासासाठी २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील या वारकरी सांप्रदायाचा आणि निस्सीम निस्वार्थी सेवेचा वारसा लाभलेल्या उमेदवाराला विजयी करून राज्यातील सत्ताधाऱ्यांना हद्दपार करण्याचे उपस्थितांना आवाहन केले.