इचलकरंजीचा पाणीप्रश्न सोडवण्याची मदन कारंडे यांची ग्वाही!

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शक्ती प्रदर्शन न करता साध्या पद्धतीने मंगळवारी उमेदवारी अर्ज महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांनी दाखल केला.अर्ज दाखल केल्यानंतर प्रसार माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते.त्या आधी इचलकरंजी येथील काँग्रेस कमिटी येथे महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जमून इचलकरंजी विधानसभा मतदारसंघांमध्ये असलेल्या सर्वच महापुरुषांना पुष्पहार अर्पण केले.

त्यानंतर साध्या पद्धतीने अर्ज दाखल केला. दरम्यान, आजी – माजी आमदार यांनी इचलकरंजीच्या पिण्याच्या पाण्याचा खेळ केला आहे का? असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी विचारला असता माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी वारणा पाणी योजना मंजूर करून आणली होती. परंतु, ती योजना रोखण्यासाठी ज्यांनी खेळ केला त्यातील एक खासदार सुटले व एक आमदार अडकले, अशी टीका मदन कारंडे यांनी नाव न घेता खासदार धैर्यशील माने व आमदार प्रकाश आवाडे यांच्यावर केली.

तसेच इचलकरंजीला जुना इतिहास आहे, उमेदवाराच्या कार्याला व पक्षाला महत्व दिले जात असल्याचेही कारंडे यांनी सांगितले. तर विधानसभेवर निवडून गेलो तर शहराचा महत्त्वाचा असा शुद्ध व मुबलक पाणी प्रश्न सोडवणार अशी ग्वाही दिली. यावेळी राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही .बी.पाटील, काँग्रेसचे संजय कांबळे, राहुल खंजीरे, मँचेस्टर आघाडीचे सागर चाळके, हिंदुराव शेळके, अजित मामा जाधव, उद्धव ठाकरे शिवसेनेचे सयाजी चव्हाण, प्रताप होगाडे, उदयसिंग पाटील, शशांक बावचकर,प्रकाश मोरबाळे,सदा मलाबादे यांच्यासह इंडिया आघाडीतील प्रमुख पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.