इस्लामपूर-शिराळ्यात बंडखोरीसह महायुतीतील तीनही नेत्यांमध्ये समन्वय ठेवताना दमछाक….

वारणा कृष्णा खोऱ्यातील इस्लामपूर शिराळा मतदारसंघात महायुतीतील उमेदवारीवरून राजकारण चांगलेच पेटले आहे. सी. बी. पाठटील यांची कारकीर्द वसंतदादांच्या नेतृत्वाखाली वाळवा आणि शिराळा तालुक्यात रूजली. भाजप जिल्हाध्यक्ष असताना त्यांनी इस्लामपूरमध्ये आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात पूर्वी विधानसभा लढवली होती. आता महायुतीमध्ये त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. दोन्हीकडे त्यांना लक्ष द्यावे लागत आहे. इच्छुक उमेदवारांच्या बदलत्या भूमिकेमुळे शिराळा मतदारसंघातील भाजपचे नेते सी. बी. पाटील यांना महायुतीतील त्यांना सावरून घेण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे पाटील यांनी बंडखोरीसह महायुतीतील तीनही नेत्यांमध्ये समन्वय ठेवताना दमछाक होत आहे.

इस्लामपूर मतदारसंघात राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात निशिकांत पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्यापूर्वी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते सी. बी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यानंतर महायुतीच्या जागा वाटपात इस्लामपूर मतदारसंघ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे गेला. त्यामुळे उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत मंगळवारी राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली निशिकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते म्हणून सी. बी. पाटील यांची प्रमुख उपस्थित होती.

दरम्यान, शिराळा मतदारसंघात भाजपची उमेदवारी सत्यजीत देशमुख यांना मिळाली. महाडिक बंधूंनी बंडखोरीचे हत्यार उपसले. या दोन्ही उमेदवारांसोबत सी. बी. पाटील यांची उपस्थिती होती. देशमुख आणि महाडिक यांनी एकाच वेळी अर्ज दाखल केले. अशा पद्धतीने महायुतीतील पक्ष धोरणाचा नियम पाळत इस्लामपूर व शिराळ्यातील इच्छुक उमेदवारांना सांभाळण्यासाठी सी. बी. पाटील यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.