सध्या प्रत्येक भागात गुन्हेगारीच्या प्रकारात भरमसाठ वाढ झाल्याचे चित्र दिसतच आहे. खून, मारामारी अगदी सऱ्हास राजेरोसपणे सुरु असल्याचे दिसत आहे. असाच एक फिल्मी स्टाईल खुनाचा थरार इस्लामपूर येथे अनुभवायला मिळाला. गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीच्या टोळक्याने धारदार शस्त्रे नाचवत विनोद उर्फ बाल्या रामचंद्र माने वडार ( वय विनोद वडार २२, रा. वडार गल्ली, इस्लामपूर) या तरुणांवर पाठलाग करत खुनी हल्ला केला. इस्लामपूर येथील शिराळा नाका ते चव्हाण कॉर्नर रस्त्यावर झालेल्या खुनीहल्ला प्रकरणी १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यातील दोघांना इस्लामपूर पोलिसांनी ताब्यात घेतले. सुरेखा रामचंद्र माने-वडर (वय ३८, लाल तारा बिल्डिंग, वडर गल्ली, इस्लामपूर) यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
चेतन पाटील (राजेबागेश्वरनगर), ज्ञानेश ऊर्फ ज्ञानेश्वर पवार (किसाननगर), गणेश पालकर, पंकज मुळीक, वैभव कांबळे, युवराज कुंभार, सोन्या कुचीवाले (सर्व इस्लामपूर) व ओंकार (पूर्ण नाव नाही) यांच्यासह अन्य दोघे अनोळखी व दोन अल्पवयीन मुले अशा १२ जणांवर गुन्हा दाखल झाला. रविवारी दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास शिराळा नाका ते चव्हाण कॉर्नर रस्त्यावरील सुझुकी शोरूमच्या पाठीमागे असणाऱ्या कोल्ड स्टोअरेजच्या व्हरांड्यात ही घटना घडली. यात विनोद ऊर्फ बाल्या रामचंद्र माने (२२, वडर गल्ली, इस्लामपूर) हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, या घटनेतील जखमी विनोद माने याच्यावर पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून त्याला जीवे ठार मारण्याच्या हेतूने गुन्हा दाखल झालेल्या १२ जणांनी हा हल्ला केला. बाल्या वडर हा त्याच्या दुचाकीवरून (एमएच १०, ई एच २५५८) त्याच्या मित्रासमवेत गाडीत पेट्रोल टाकण्यासाठी निघाला होता. त्याच्यासमवेत प्रवीण विजय लोखंडे, जुबेर शब्बीर मुजावर हे दोघे होते.
शिराळा नाका ते चव्हाण कॉर्नर परिसरातून पेट्रोल टाकण्यासाठी जात असताना वरील दहा ते बारा जणांनी बेकायदेशीर जमाव जमवून त्याच्या हातातील एडका (पारळी), चाकूने तसेच लाथाबुक्क्यांनी बाल्या याला मारहाण केली. या मारहाणीत बाल्या वडर याच्या पायावर, हातावर, चेहऱ्यावर जबर वार झाले आहेत. तसेच त्याच्या मित्राच्या दुचाकीचे नुकसान झाले आहे. हल्लेखोरांमधील दोघांना इस्लामपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.