मंत्र्यांच्या संपत्तीत 5 वर्षांमध्ये भरघोस वाढ, कोणाची संपत्ती 772 टक्क्यांनी वाढली तर काहींची 220 टक्के

गेल्या पाच वर्षांमध्ये शिंदे,फडणवीस, पवार सरकारमधील कॅबिनेट मंत्र्यांची संपत्ती काही प्रमाणात वाढल्याचं समोर आलं आहे. मात्र या सरकारमध्ये असे देखील काही मंत्री आहेत, ज्यांच्या संपत्तीमध्ये अनेक पटींनी वाढ झाली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भरलेल्या उमेदवारी अर्जातून ही माहिती समोर आली आहे.यातील अनेक मंत्र्यांनी स्थावर संपत्ती जसं की घर, जमीन बंगला यामध्ये गुंतवणूक केल्याचं समोर आलं आहे.

महिला आणि बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या संपत्तीमध्ये तब्बल 772 टक्क्यांची वाढ झाली आहे.2019 मध्ये आदिती तटकरे यांची संपत्ती 39 लाख रुपये होती, तर 2024 मध्ये त्यांची संपत्ती 3.4 कोटी रुपये इतकी झाली आहे.तर मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या संपत्तीमध्ये 117 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2019 मध्ये रविंद्र चव्हाण यांची संपत्ती 7 कोटी रुपये इतकी होती, त्यात वाढ होऊन ती आता 15.5 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. मंत्री संजय राठोड यांच्या संपत्तीमध्ये 220 टक्क्यांची वाढ झाली आहे. संजय राठोड यांची संपत्ती 5.9 कोटी रुपयांवरून 15.9 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. संजय बंसोडे यांची संपत्ती 144 टक्क्यांनी वाढली आहे. त्यांची संपत्ती दोन कोटी रुपयांवरून 5 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपत्तीमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये 66 टक्क्यांची वाढ झाली आहे.तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपत्तीमध्ये 56 टक्के तर अजित पवार यांच्या संपत्तीमध्ये 44 टक्क्यांची वाढ झाली आहे.दरम्यान महायुतीमध्ये केवळ एक मंत्री असा आहे ज्यांच्या संपत्तीमध्ये वाढ होण्याऐवजी घट झाली आहे. मंगल प्रभात लोढा यांची संपत्ती वाढण्याऐवजी कमी झाली आहे.