राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 1 जुलैपासून दुधाला तीस रुपये दर देण्याचा निर्णय घेतला आहे. याच बरोबर त्यांना पाच रुपये अनुदान देखील देण्यात येणार आहे.मात्र आतापर्यंत याचा लाभ दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळत नसल्याने पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री विखे पाटील यांनी हा लाभ दूध उत्पादकांपर्यंत पोहचण्यासाठी तातडीने अंमलबजावणी करा असे आदेश दिले आहे.
याच बरोबर दूध अनुदानासाठीचा शेतकऱ्यांचा डेटा संकलन व अपलोड करण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये तसेच जाचक अटी वगळण्यात याव्यात असेही निर्देशही त्यांनी दूध संघ आणि दूध उत्पादक शेतकरी यांच्यासोबत घेतलेल्या बैठकीत दिले. दुग्धव्यवसाय विकास मंत्री विखे पाटील म्हणाले, शासन दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत गंभीर असून दूध दर वाढीसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी सरकार सकारात्मक आहे.
दुधाला हमी भाव मिळावा यासाठी राज्य सरकार तर्फे केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.नुकतीच केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची या संदर्भात भेट घेतली असून केंद्र सरकार सुद्धा सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.