उत्तराखंडमध्ये भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली बस खोल दरीत कोसळली; 15 जणांचा मृत्यू

उत्तराखंडच्या अल्मोडा या ठिकाणी एका प्रवाशी बसचा भीषण अपघात झाला आहे. जवळपास 40 प्रवाशांनी भरलेली बस खोल दरीत कोसळली आहे. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या या ठिकाणी SDRF आणि पोलीस प्रशासनाकडून बचावकार्य सुरु असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी गौरीखालहून रामनकगरडे एक प्रवाशी बस निघाली होती. यावेळी बसमध्ये साधारण 40 पेक्षा जास्त प्रवाशी प्रवास करत होते. यावेळी गढवाल-रामनगर मार्गावरील सल्ट गावाजवळ असलेल्या वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. यानंतर अवघ्या काही क्षणात ही प्रवाशी बस खोल दरीत कोसळली.

बस खाली कोसळताच अनेक प्रवाशांनी आरडाओरड सुरु केली. या दुर्घटनेदरम्यान काही प्रवाशी हे बसमधून बाहेर फेकले गेले. या दुर्घटनेत आतापर्यंत 15 पेक्षा जास्त प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. सकाळी नऊच्या सुमारास काही जखमी प्रवाशांनी नियंत्रण कक्षाला याबद्दलची माहिती दिली होती.

सध्या या ठिकाणी मोठ्या वेगाने बचावकार्य सुरु आहे. तसेच या दुर्घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच SDRF आणि पोलीस प्रशासनाकडून मदत कार्य सुरू करण्यात आले आहे.आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विनीत पाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सल्ट आणि रानीखेत येथून काही बचावपथके घटनास्थळी पाठवण्यात आली आहेत. या दुर्घटनेत आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या बचाव कार्य वेगाने सुरु आहे. या दुर्घटनेत नेमका किती लोकांचा मृत्यू झाला, याची माहिती बचावकार्य पूर्ण झाल्यानंतरच सांगता येईल. या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.