कोरोनाच्या ओमिक्रॉनचा नवीन प्रकार जेएन.१ च्या देशातील वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली, कर्नाटकसह अनेक राज्य सरकारांनी विशेष आरोग्य दिशानिर्देश जारी केले आहेत. सर्व रुग्णालयांना बेड, ऑक्सिजन, औषधे आणि लसींचा पूर्ण पुरवठा ठेवण्यास सांगण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य विभाग राज्यांशी नियमित संपर्कात असून कोरोना रुग्णसंख्येबाबत दिल्लीला दैनंदिन अहवाल पाठविण्याची सूचना करण्यात आली आहे.
यावेळी रुग्णांमध्ये आढळत असलेला ओमिक्रॉनचा जेएन.१ हा नवीन प्रकार आणि एलएफ ७ आणि एनबी १.८ हे त्याचे उप-प्रकार आढळू लागले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार कोवीडचे हे नवीन प्रकार पूर्वीपेक्षा जास्त धोकादायक आहेत किंवा वेगाने पसरत आहेत असा पुरावा अद्याप मिळालेला नाही. मात्र त्यांचा परिणाम कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांवर होऊ शकतो असा इशारा देण्यात आला आहे. दिल्लीतील तसेच आसपासच्या नोएडा, गुरुग्राम, गाझियाबाद, फरीदाबाद या शहरांतील कोरोना रुग्णसंख्याही वाढत चालली आहे.
दिल्लीच्या सर्व रुग्णालयांना प्रत्येक पॉझिटिव्ह कोविड नमुना जीनोम सिक्वेन्सिंगसाठी लोक नायक रुग्णालयात पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व रुग्णालयांनी आपले अहवाल दररोज दिल्ली आरोग्य डेटा पोर्टलवर अपलोड करावेत, असे दिल्ली सरकारने निर्देश दिले आहेत. प्रत्येक रुग्णालयाने कोविडच्या नव्या व्हेरियंटचा सामना करण्यासाठी पूर्णपणे तयारी ठेवावी. ऑक्सिजनचा साठा तपासावा, बेडची उपलब्धता सुनिश्चित करावी, औषधे आणि लसींचा साठा तयार ठेवावा, व्हेंटिलेटर सारखी यंत्रसामग्री सदैव सक्रिय ठेवावी अशा सूचना दिल्ली सरकारने दिल्या आहेत.
मे महिन्यात आतापर्यंत केरळमध्ये कोविड चे २७३ रुग्ण आढळले. महाराष्ट्रात यंदा जानेवारीपासून चाचणी केलेल्या ६,८१९ स्वॅब नमुन्यांपैकी २१० कोरोना रुग्णांची पुष्टी झाली आहे, त्यापैकी १८३ रुग्ण मुंबईतील आहेत. राज्यात शुक्रवारी ४५ नवीन रुग्ण आढळले, ज्यात मुंबईमध्ये ३५, पुण्यात ४, कोल्हापूरमध्ये २, रायगडमध्ये २ आणि ठाणे आणि लातूरमध्ये प्रत्येकी १ रुग्ण आढळला. गुजरातमध्ये आतापर्यंत एकूण ४० प्रकरणे नोंदवली गेली आहेत, त्यापैकी ३३ सक्रिय आहेत. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये ४ व नोएडात १ नवीन रुग्ण आढळले. हरियाणामध्ये मागच्या ४८ तासांत ५ रुग्ण आढळले आहेत. सायबर सिटी गुरुग्राममधील तीन रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. वजिराबादच्या ४५ वर्षीय रहिवाशाला पूर्ण लसीकरण होऊनही कोरोनाची लागण झाल्याचे आढळलेआहे