“देवाभाऊ, जॅकेट भाऊ आणि दाढी भाऊ”, उद्धव ठाकरेंचा सणसणीत टोला, म्हणाले “हे सर्व खाऊ भाऊ…”

राज्यात विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचा धुराळा उडण्यास सुरुवात झाली आहे. सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरातून प्रचाराची सुरुवात केली. कोल्हापूरचे उमेदवार के. पी. पाटील यांच्यासाठी उद्धव ठाकरेंनी पहिली सभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तुमचे आशीर्वाद आहेत तोपर्यंत आव्हानाला भीत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

“महाराष्ट्राच्या हक्काचा एक कण देत नव्हतो. एवढा दरारा दिल्लीत केला होता. म्हणून त्यांनी आपलं सरकार पाडलं. त्यांना महाराष्ट्र विकायचा आहे. गुजरातला सर्व न्यायचं आहे. त्यामुळे गद्दारी करून सर्व विकलं जात आहे. गद्दाराला मुख्यमंत्री म्हणून बसवलं. तीन तीन भाऊ येत आहे. देवाभाऊ, जॅकेट भाऊ आणि दाढी भाऊ. तुमचा भाऊ कोणता. काही भाऊबिऊ नाही. हे सर्व खाऊ भाऊ आहेत”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

“उद्या राहुल गांधी मुंबईत येत आहेत. आम्ही उद्या जाहीरनामा प्रकाशित करत आहोत. राज्यात महिलांना मोफत शिक्षण आहे. मुलांनाही मोफत शिक्षण देणारच. दोन्ही आधारस्तंभ आहेत. भविष्य आहे. मुलगी आणि मुलगा आधारस्तंभ आहेत. मुलींना मोफत उच्च शिक्षण मिळत असेल तर मुलांनी काय गुन्हा केला, त्यांना मोफत उच्च शिक्षण देणार हे जाहीर करतो”, अशी मोठी घोषणा उद्धव ठाकरेंनी केली.

महिला पोलिसांची पदं रिक्त असतील तर त्यांची सुरक्षा कोण करणार. आम्ही महिला पोलिसांची भरती करू. महिलासांठी स्वतंत्र पोलीस ठाणे उभे करणार. याठिकाणी सर्व स्टाफ महिला असतील. मुंबई गिळणारा धारावीचा अदानी प्रकल्प रद्द करून धारावीत आम्ही धारावीकरांना घरे देणारच. मुंबई आणि धारावीत परवडेल अशा किंमतीत घरे देणार. मुंबईत या. मुंबई तुमची आहे. मराठी माणसांनी रक्त सांडवून बलिदान करून मिळवलेली मुंबई आहे. ती अदानीच्या घश्यात जाऊ देणार नाही. तुमचा मुंबईवर हक्क आहे. आम्ही शेतकऱ्यांना हमी भाव देणारच, असे उद्धव ठाकरे म्हणाले.