काकासाहेबांचं अकाली निधन झालं नसतं…तर तालुक्यात शेकापचं नामोनिशान राहिलं नसतं ; प्रा प्रबुद्धचंद्र झपके

दिपकआबांनी मैत्रीला जागून केलेल्या मदतीमुळेच २०१९ च्या निवडणुकीत शहाजीबापूंचा निसटता विजय झाला. गेल्या काही महिन्यांपूर्वी एकवेळ मी बाजूला होईन पण दिपकआबांना आमदार करीन असा शब्द दिला होता.पण, मित्राने देखील आता पाठ फिरवली. काँग्रेसचा पारंपारिक शत्रू शेकाप असून काकासाहेब साळुंखे पाटील यांचं अकाली निधन झालं नसतं तर आज तालुक्यात शेकापचे नामोनिशानही राहिले नसतं अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.सी. झपके यांनी केली.


महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या प्रचारार्थ बामणी, मांजरी, देवकतेवाडी, देवळे, सावे, मेथवडे येथे गावभेट दौरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मतदारांशी संवाद साधताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.सी. झपके बोलत होते. यावेळी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील, सदाशिवतात्या साळुंखे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभिषेक कांबळे, रावसाहेब इंगोले, नानासो पाटील, शंकर बिचुकले, शिवाजीराव चव्हाण, भगवान इंगोले, अजित देवकते, सुनील भोरे, नंदकुमार दिघे, तुषार इंगळे, दीपक शिनगारे, सचिन शिनगारे, अमृत उबाळे, प्रकाश शेळके, विनायक कुलकर्णी, भाऊसाहेब जगताप, नवनाथ शिनगारे यांच्यासह महा विकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.


पुढे बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.सी. झपके म्हणाले की, दिपकआबांनी कर्तृत्वाने वारसा सिद्ध केला असून दिपकआबांमुळेच बापू प्रसिद्धीच्या शिखरावर आहेत. गेल्या पाच वर्षात भाजपमुळे राज्याचा बिहार, उत्तर प्रदेश होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजपचे फोडाफोडीचे राजकारण, कूटनीतीला जनता त्रस्त झाली असून लोकसभेत झटका बसल्यावर सत्ताधाऱ्यांना बहिणीची आठवण झाली. पण शेतकरी भावांना कधी मदत करणार असा सवाल उपस्थित करून खतांवरचा जी.एस.टी.कमी करावा असे सांगितले.

राज्याचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही. दिपकआबांचा विजय निश्चित आहे आता फक्त मताधिक्य किती मिळणार हे पाहायचे आहे. ५५ वर्षाची आमदारकी मिळून देखील शेकापला पाण्याचा प्रश्न सोडवता आला नाही. काकासाहेब साळुंखे पाटील यांनी खऱ्या अर्थाने पाण्याचा प्रश्न सोडविला. गणपतराव देशमुख आणि शहाजीबापूंना आमदार करण्यात दिपकआबांचा वाटा सिंहाचा आहे. आता तर काल परवा राजकारणात आलेल्यांना आमदारकीची स्वप्न पडायला लागली आहेत. राजकारणात झालेला अन्याय दूर करण्यासाठी दिपकआबांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन काँग्रेसचे जेष्ठ नेते पी.सी.झपके यांनी केले.

शहाजीबापूंना नेहमीच खोक्यांची भाषा जमते. तर मातीशी इमान राखणारा नेता म्हणून दिपकआबांची ओळख आहे. शोषीत, पीडित, गोरगरीब, कष्टकरी, कामगार, शेतमजूर, उपेक्षित समाजाचा आवाज म्हणजे दिपकआबा आहे. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील आहेत. काँग्रेसचा आणि शेकापचा काडीमात्र संबंध नाही. आता सांगोला तालुक्याच्या विकासाची मशाल काँग्रेसच्या हातात आहे. ;
अभिषेक कांबळे, काँग्रेस तालुकाध्यक्ष