राज्य शासनाने जून २०२३ मध्ये सर्वसमावेशक पीकविमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. रब्बी हंगामातही प्रतिअर्ज एक रुपयात पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होता येणार आहे. नैसर्गिक आपत्तीत पिकांना विमा संरक्षण मिळावे, यासाठी रब्बी हंगामात गहू, हरभरा पिकांची पेरणी केली असल्यास अशा शेतकऱ्यांनी मुदतीत विमा भरणे आवश्यक आहे. खरीपप्रमाणेच रब्बी हंगामातही केवळ एक रुपयात पीक विमा भरता येणार आहे.
नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळणार आहे. कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिकतेप्रमाणे योजनेत सहभागी होता येईल. रब्बी गहू बागायती, हरभरा, रब्बी कांदा, ज्वारी ही पिके अधिसूचित करण्यात आली आहेत. रब्बी हंगामासाठी पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी कांदा, गहू, हरभऱ्याची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना नोंदणीसाठी १५ डिसेंबरची, तर ज्वारीची पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना ३० नोव्हेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. मुदतीपूर्वी शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभागी व्हावे, यासाठी कृषी विभागाकडून गावस्तरावर जनजागृती केली जात आहे.
ऑनलाइनही भरता येईल अर्ज
पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना सहजपणे अर्ज करता यावा, यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचीदेखील सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. pmfby पोर्टल तसेच https//pmfby.gov.in या संकेतस्थळावर स्वतः तसेच बँक, विमा कंपनी प्रतिनिधी व सामूहिक सेवा केंद्रामार्फत अर्ज करता येतो.
अर्ज प्रक्रिया सुरू
खरीप हंगामाच्या तुलनेत रब्बी हंगामात पीकविमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी असते. रब्बीचे क्षेत्र कमी असल्यानेच पीकविमा योजनेत सहभागी शेतकरीही कमी असतात. गतवर्षी रब्बी हंगामातील गहू, हरभरा पिकांचे मोठे नुकसान झाले होते. नैसर्गिक आपत्तीचे काही सांगता येत नसल्याने हंगामातील पिकांना विमा संरक्षण देणे आवश्यक असते. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, पेरणी केलेल्या शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्याचे आवाहन कृषी विभाग व विमा कंपनीने केले आहे.
मुदतीपूर्वी विमा भरावा
पिकांना विमा संरक्षण असल्यास नैसर्गिक आपत्तीत नुकसान झाल्यास भरपाई म्हणून विमा कंपनीकडे मोबदला मागता येतो. त्यासाठी रब्बी हंगामात गहू, हरभरा पिकांची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभागी होण्यासाठी मुदतीपूर्वी अर्ज करून पिकांना विमा कवच द्यावे, असे आवाहन कृषी विभाग व विमा कंपनीकडून करण्यात आले आहे.