जयंत पाटील यांनी राज्याच्या राजकारणातून थोडीसा वेळ काढून आपल्या मतदारसंघातील गोटखिंडी, बावची, पोखर्णी, नागाव, भडकंबे, तुजारपूर, गाताडवाडी, अहिरवाडी, पडवळवाडी, माळवाडी, सावळवाडी, नवेखेड, जुनेखेड, मसूचीवाडी, मिरजवाडी, दुधारी, भवानीनगर, कि.म.गड, नरसिंहपूर, शिरटे आदी गावांना भेटी दिल्या. येथील कार्यकर्ते व मतदारांशी संवाद साधला. याचवेळी प्रचार कामांचा आढावाही घेतला. या दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, नेर्लेचे लोकनियुक्त सरपंच संजय पाटील उपस्थित होते.
आमदार जयंत पाटील यांच्या दौयात भेटणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये युवक, महिलांची लक्षणीय उपस्थिती दिसली. इस्लामपूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रेची मुसळधार पावसातही जोरदार सांगता सभा झाली. या सभेसही नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. साहेब, तुम्ही मतदारसंघाची कसलीच चिंता करू नका. आपण प्रचारासाठी राज्यात फिरा. आम्ही आपला गड अबाधित ठेवण्यासाठी समर्थ आहोत.
इस्लामपूर मतदारसंघात कोणीही येऊ द्या आमच्यावर काहीही फरक पडणार नाही. राज्यातील जातीयवादी भाजपा युतीचे सरकार खाली खेचा, अशा भावना मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे व्यक्त केल्या. गेल्या पाच वर्षात व त्यापूर्वीही केलेल विकासकामे आपल्या समोर आहेत. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे औक्षण करून स्वागत केले.
कार्यकर्त्यांशी संवाद साधताना जयंत पाटील म्हणाले, माझा आपल्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे मला मतदारसंघाची कोणतीही चिंता नाही. आपले घड्याळ चिन्ह चोरीला गेले आहे. आपले नवे चिन्ह तुतारी वाजविणारा माणूस आहे. आपले चिन्ह घरा-घरापर्यंत पोहोचवा.आपण बूथवर लक्ष केंद्रित करा प्रत्येकाने घरे वाटून घ्या आणि प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचा. आपण आपल्य पक्षाच्या वतीने राज्यात ८७ विधानसभ मतदारसंघात उमेदवार उभे केले आहेत. सर्व मतदारसंघांना मला भेट द्यावी लागणार आहे, वेळ कमी आहे त्यामुळे आपण सर्वांनी एकदिलाने प्रचाराची धुरा सांभाळायला हवी.