सुहास बाबर यांना पाठिंबा देत विजयासाठी काँग्रेसचा हात धनुष्यबाणासोबत राहणार

काँग्रेसचे दिवंगत नेते जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मोहनराव भोसले यांचे चिरंजीव आटपाडी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयदीप भोसले यांनी विकासाच्या मुद्दयावर शिंदेसेनेचे उमेदवार सुहास बाबर यांना पाठिंबा देत विजयासाठी काँग्रेसचा हात धनुष्यबाणासोबत राहणार असल्याची ग्वाही दिली. काँग्रेसच्या पाठिंब्याने आटपाडी तालुक्यात शिंदेसेनेला ताकद मिळाली आहे. नेलकरंजी येथे जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील व सुहास बाबर यांच्या उपस्थितीत लकरंजी येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

सुहास बाबर म्हणाले, मोहनकाका भोसले यांच्या पश्चात जयदीप भोसले यांनी दिलेला पाठिंबा मोलाचा आहे. आगामी काळात नेलकरंजी परिसरात उर्वरित विकासकामांना न्याय देऊ. जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील म्हणाले, जयदीप भोसले यांच्यासह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय शिंदेसेनेचे बळ वाढवणारा आहे.

पाठिंबा देणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान केला जाईल. यावेळी जिल्हा मजूर फेडरेशनचे उपाध्यक्ष बाबासो भोसले, बाजार समितीचे उपसभापती राहुल गायकवाड, सारिका भिसे, अनिल भिंगे, सदाशिव ढगे, जालिंदर भोसले, उमर शेख, बाळासो खाडे, बाबासो पुजारी उपस्थित होते.