आमदार जयंतरावांच्या नेतृत्वाखाली विरोधक एकत्र येणार? राजकारणाचा तिढा कायम…

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अनेक राजकीय समीकरणे बदललेली सर्वानीच पहिली. अनेक पक्षप्रवेश देखील झाले. एकूणच अनेक घडामोडींना वेग आला. विधानसभा निवडणुकीत महायुतीला विजय मिळाला. यानंतर अनेक चर्चाना ऊत आला. राज्यात एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या चर्चांनी राज्याच्या राजकारणात धुरळा उडवून दिला आहे. अशाच वेळी सांगली जिल्ह्यात त्यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप विरोधी एकजुटीची चर्चाही जोर धरत आहे.

माजी आमदार विलासराव जगताप यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासमोर तसा प्रस्ताव ठेवला होता. त्यानंतर त्यांनी खासदार विशाल पाटील यांच्याशी चर्चा केली. ‘त्यांचा निरोप मी आमदार विश्वजीत कदम यांना पाठवला आहे’, अशी माहिती खासदार पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. संख (ता. जत) येथे बसवराज पाटील यांच्या पुतळा अनावरण समारंभात विलासराव जगताप यांनी ‘झाले गेले विसरून जयंत पाटील यांनी भाजप विरोधी लोकांची मोळी बांधावी’, असे आवाहन केले होते. याच आवाहनाला काँग्रेस खासदार विशाल पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. जगतापसाहेब परखड व उघड बोलणारे आहेत. त्यांनी आपल्या प्रस्तावावर थेट माझ्याशी चर्चा केली.

भाजप राज्यात ज्या पद्धतीने जनतेची फसवणूक करून सत्तेत येत आहे, ते चिंताजनक असल्याचे विशाल पाटील म्हणाले. तसेच सांगली जिल्ह्यात बीडसारखी अवस्था होऊ नये यासाठी विरोधी विचारांच्या लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे. राजकीय आणि वैचारिक विरोध बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र यावे, असे त्यांना वाटते. अर्थात, तो प्रस्ताव कोणत्या निवडणुकांसाठी आहे की नाही यावर अद्याप चर्चा झालेली नाही.