इस्लामपुर येथे गुढीपाडव्यानिमित्त राजेबागेश्वरची एकदिवसीय यात्रा; १०० वर्षांच्या वटवृक्षाने पाहिले हिंदू-मुस्लीम ऐक्य

उरुण-इस्लामपूर शहराच्या चारही बाजूंनी पिरांची देवस्थाने आहेत. यापैकी संभूआप्पा-बुवाफनची यात्रा १५ दिवस भरते, तर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राजेबागेश्वरची एकदिवसीय यात्रा असते. दोन्ही देवस्थानांसाठी सर्व समाजांतील भक्तगण एकत्रित येतात. यामध्ये मुस्लीम समाजाचा समावेश आहे. याठिकाणी गेल्या १०० हून अधिक वर्षे वटवृक्ष आजही दिमाखात उभा आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेला सूर्योदयानंतर लोक घराच्या प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभारतात. याच दिवशी राजेबागेश्वरची यात्रा भरते.

उरूण परिसरातून माजी पोलिस पाटील बाळासाहेब पाटील आणि त्यांचे चिरंजीव अजिंक्य पाटील यांचा मानाचा गलफ असतो. उरूण परिसरातून मोठ्या प्रमाणात बैलगाडातून भाविक जातात, तर काही बैलगाडे राजेबागेश्वर दर्शनास जातात. देवपूजेचा मान भोई समाजास असल्याने यावर्षीचा मान डॉ. राहुल कुंडले यांच्या कुटुंबास आहे. राजेबागेश्वर येथे सावलीचे छत्र देणाऱ्या या वड वृक्षाचेही दर्शन होते, तर या मंदिरामागे पिंपळ वृक्ष आहे.

भोई समाजासह इतर भक्तांनी परिसर सौंदर्यमय बनवला आहे. त्यामुळे परिसर पर्यटनासाठी पूरक झाला आहे. त्यामुळे येथे दैनंदिन येणाऱ्या भाविकांच्या संख्येतही वाढ झाली आहे.