चिकुर्डे ता. वाळवा तालुक्यातील येथे विवाहिता कविता उत्तम बुरसे-पाटील (वय ४२) यांचा घरगुती वादातून पतीने डोक्यात दगड घालून खून केला. घटनेनंतर संशयित पती उत्तम हणमंत बुरसे-पाटील (५२) हा स्वतः सकाळी कुरळप पोलिसांत हजर झाला. याबाबतची फिर्याद नीतेश श्रीकांत बुरसे-पाटील यांनी कुरळप पोलिसांत दिली. त्यावरून उत्तमवर खुनाचा गुन्हा नोंद झाला. दरम्यान, वाळवा तालुक्यात कुरळप पोलिस ठाण्यांतर्गतच चार दिवसांपूर्वी झालेल्या इंदूमती पाटील या वृद्धेचा धारदार विळ्याने अनोळखीने खून केला.
एका आठवड्यात दोन महिलांचा खून झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, करंजवडेतील कविताचा चोवीस वर्षांपूर्वी चिकुर्डे गावातील उत्तम बुरसे-पाटील याच्याशी विवाह झाला होता. उत्तम हा उच्चशिक्षित असून, सध्या तो एका सहकारी साखर कारखान्यात नोकरीला होता.
घरात वारंवार वाद होत असल्याने कविता चार महिन्यांपूर्वी माहेरी करंजवडे या गावी राहायला गेल्या होत्या. मात्र पती उत्तम याने, ‘तू परत ये, अन्यथा मी माझ्या जीवाचे काहीतरी करून घेईन,’ अशी धमकी दिल्याने त्या नवरात्रोत्सवाच्या दरम्यान दोन महिन्यांपूर्वी सासरी आल्या होत्या. काल (ता. १२) सायंकाळी गावात प्रचार करून उत्तम रात्री उशिरा घरी आला. त्यावेळी त्याचे आणि पत्नीचे घरगुती कारणावरून भांडण झाले. त्यानंतर दोघेही झोपी गेले. मात्र झोपलेल्या उत्तमच्या मनात काहीतरी शिजत होते. पहाटे पाचच्या सुमारास त्याने घराबाहेरील मोठा दगड आणून झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात घातला.
त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर अंघोळ करून शेजारी असलेल्या भावकीतील लोकांना, बायकोच्या डोक्यात दगड घातल्याचे सांगून कुरळप पोलिसांत हजर झाला. शेजाऱ्यांनी उत्तमच्या घरी जाऊन त्याच्या वक्तव्याची शहानिशा केली असता कविता रक्ताच्या थारोळ्यात मृत्युमुखी पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
त्यानंतर त्यांनी नातलगांना याबाबत कळविले. कुरळप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. शवविच्छेदनासाठी कविता यांचा मृतदेह सांगली-मिरज येथील शासकीय रुग्णालयात पाठविला. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक सुनील माने, कुरळप ठाण्याचे पोलिस राजेंद्र जाधव, दीपक खोमणे व फॉरेन्सिक लॅबचे पथक अधिक तपास करत आहे.