खानापूरच्या शेतकरी महिलेला कोटीचा गंडा! तिघा संशयितांना अटक

व्हर्टिकल फार्मिंग अंतर्गत हळदीची लागवड करून मिळालेले उत्पादन आम्हीच खरेदी करून पैसे देतो, असे सांगून खानापूर येथील एका शेतकरी महिलेला 1 कोटी रुपयांची टोपी घालून फरारी झालेल्या ठाणे येथील तिघा ठकसेनांना जिल्हा सीईएन पोलिसांनी गुरुवारी (दि.26) अटक केली आहे. प्रशांत गोविंदराव झाडे (वय 47), संदेश गणपत खामकर (वय 48), संदीप चिंतामण सावंत (वय 55, तिघेही रा. ठाणे-मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

त्यांनी देशभरात चार हजारांहून अधिकजणांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला असल्याचे पोलिसांनी सांगितले. मणिबेन विठ्ठलदास पटेल (रा. खानापूर) असे फसवणूक झालेल्या शेतकरी महिलेचे नाव आहे. हे कुटुंब मूळचे गुजरातेतील आहे. त्यांना वरील तिघांनी 2022 मध्ये गंडा घातला होता. एमएसएएस अ‍ॅग्री अँड अ‍ॅक्वा एलएलपी कंपनीमध्ये एक कोटी रुपये गुंतवल्यास त्या मोबदल्यात तुम्हाला व्हर्टीकल फार्मिंग अंतर्गत हळदीची लागवड करून देऊ.

तसेच मिळालेले उत्पन्न आम्हीच खरेदी करून त्या मोबदल्यात तुम्हाला पैसे दिले जातील, असे सांगून त्या शेतकर्‍याकडून खानापूर येथील आयसीआयसीआय बँक खात्यात दोन टप्प्यात एक कोटी रुपये वर्ग करून घेतले.मात्र, त्यानंतर फार्मिंग तर नाहीच पैशांचा परतावा देखील केला नाही. त्यामुळे त्या शेतकर्‍याने संबंधितांकडे पैशासाठी तगादा लावला. पण, त्यांनी उडवाउडवी केली. त्यांच्याशी संपर्कदेखील होऊ शकला नाही.

त्यामुळे याप्रकरणी खानापूर पोलिसांत संबंधितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. प्रकरण जिल्हा पोलिस प्रमुखांनी तपासासाठी जिल्हा सीएन पोलिसांकडे वर्ग केले होते. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून वरील तिघा संशयितांना पुण्यातून अटक केली आहे. पोलिस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर पुढील तपास करत आहेत.