20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, बँकाही बंद! राज्य सरकारचा आदेश जारी……

राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी (Election) 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत असून 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे, राजकीय नेत्यांनी प्रचारसभांचा आणि गाठीभेटींचा धडाकाच सुरू केला आहे.त्याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगही जोमाने कामाला लागले असून भरारी पथके, स्थिर पथके, पोलीस यंत्रणा व प्रशासकीय यंत्रणांच्या माध्यमातून मतदानाचा टक्का वाढवा यासाठी जनजागृती करत आहे.

विशेष म्हणजे राज्य निवडणूक आयोगानेही यापूर्वी विधानसभा निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मतदानादिवशी सार्वजनिक सुट्टी (Holiday) देण्यात येत असल्याचं सांगितलं होतं. तसेच, राज्यातील कामगार आयुक्तांना तसे निर्देशही दिले होते. आता, राज्य सरकारकडून परिपरत्रक जारी करत 20 नोव्हेंबर रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मंत्रालयातील सर्व विभागांना विनंती करण्यात येते की, त्यांनी सदरची अधिसूचना त्यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, मंडळे इत्यादींच्या निदर्शनास आणावी.

तसेच केंद्र शासनाधीन शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्याचे सार्वजनिक उपक्रम, बँका इत्यादींना सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, असेही परिपत्रकात म्हटले आहे. दरम्यान, राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभाग यांनी सदर अधिसूचना काढून प्रसिद्ध करावी, असे आदेशही महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी दिले आहेत. शासनाचे उपसचिव दिलीप देशपांडे यांच्या सहीने हे पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.