सध्याची निवडणूक ही महाराष्ट्राचं भवितव्य ठरवणारी असेल; शरद पवार

महाराष्ट्रात सध्या निवडणुकीचं वातावरण आहे. यातच राजकीय सभांचा धुरळा उडला आहे. शरद पवारांची काल इचलकरंजी येथे जाहीर सभा होती. महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांच्यासाठी इचलकरंजीत शरद पवारांच्या सभेचे आयोजन करण्यात आलं होते. मात्र पवार भाषणाला उभे राहतात पावसाला सुरुवात झाली तरीरी त्यांनी आपले भाषण सुरु ठेवले.यावेळी बोलताना शरद पवारांनी सध्याची निवडणूक ही महाराष्ट्राचं भवितव्य ठरवणारी असेल, अशी प्रतिक्रिया दिली.

‘मला आनंद आहे की, आज इचलकरंजी मतदारसंघातून मदनराव कारंडे, हातकणंगलेमधून राजू आवळे, शिरोळमधून गणपतरावजी पाटील यांची आज एकत्रित प्रचारसभा पार पडली. ही निवडणूक महाराष्ट्राचे भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. त्याच्यामध्ये माझा आणि जाहीर सभेचा आणि पावसाचा काहीतरी संबंध आहे.

महाराष्ट्रामध्ये अनेक वेळेला मी बोलायला उभा राहिलो की, पावसाची सुरुवात होते. हे याआधीही अनेकदा झालं आहे की मी बोलायला सुरुवात केली की पावसाला सुरुवात होते आणि अशा वेळी निवडणुकीचे निकाल चांगले लागतात. यावेळीही तुम्हा सर्वांना हे ठरवावं लागेल की महाराष्ट्राचं सरकार कुणाच्या हाती सोपवायचं आहे’, असं शरद पवार म्हणाले.

सभेवर सुरुवातीपासून पावसाचे सावट होते. अधून – मधून थेंब पडत होते. श्री. शरद पवार मंचावर आल्यानंतर पावसाने जोर धरला. यावेळी उत्तम पाटील यांचे भाषण सुरू होते. त्यावेळी नागरिकांनी श्री. पवार यांना बोलण्याचा जोरदार आग्रह धरला. जोरदार पावसाबरोबरच श्री. पवार यांच्या भाषणाला सुरुवात झाली. नागरिकांनी जागेवरून न हालता पवार यांचे भाषण ऐकले. पावसापासून बचाव करण्यासाठी अनेक नागरिकांनी डोक्यावर खुर्च्या घेतल्या होत्या.

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपकडून राहुल आवाडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मदन कारंडे आहेत. मदन कारंडे यांनी मतदारसंघ पिंजून काढत आवाडेपुढे आव्हान उभं केलं आहे. आता प्रचाराच्या उत्तरार्धात शरद पवार यांची पावसात सभा झाल्याने चुरस आणखी वाढणार आहे.