संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी आता अवघेच दिवस उरले आहेत. 20 नोव्हेंबरला राज्यभरात एकाच टप्प्यात मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल लागेल. 18 तारखेला प्रचाराचा अवधी संपत असून त्याच पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्यभरात महायुती आणि मविआच्या नेत्यांनी प्रचाराचा, सभांचा धडाका लावला आहे.
काय झाडी, काय डोंगर, फेम आमदार शहाजी बापू पाटील यांची सांगोल्यात यंदा चांगलीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कारण याच मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून दीपक साळुंखे पाटील तर शेकापकडून डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचा त्यांच्यासमोर तगडं आव्हान उभे राहिले आहे.महाविकास आघाडीतून शेकाप आणि उद्धव सेना स्वतंत्र लढत असल्यामुळे ही निवडणूक आता तिरंगी झाली आहे. त्यामुळे सांगोल्यातील या हाय व्होल्टेज लढतीकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.यंदा शहाजी बापू पाटील हे महायुतीकडून त्यांचे सहकारी राहिलेले दीपक आबांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोडचिट्टी देऊन उद्धव सेनेकडून तर स्वर्गीय गणपत आबांची दुसरे नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचा शेकपकडून नशीब आजमावत आहेत.
गणपतराव देशमुख आणि शहाजी बापू पाटील यांच्या निकालाकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.शिवसेना पक्ष फुटीत शहाजी बापू पाटलांनी ठाकरेंची साथ सोडली. त्यामुळे शहाजी बापू पाटलांवर सध्या सांगोल्यातील जनता नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच त्यांच्यावर विरोधकांकडून गद्दार अशी टिका करण्यास सुरूवात केली आहे. तर ठाकरे गटाकडूनही त्यांच्याविरोधात मोठी रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी सध्या चांगल्याच वाढल्या असल्याचे बोललं जात आहे.
सांगोला विधानसभा मतदारसंघातील कळीचे मुद्दे बघायचे झाल्यास यास तालुक्यात तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध होण्यासाठी मोठे उद्योगधंदे किंवा औद्योगिक वसाहत उभी न राहिल्यामुळे या ठिकाणी प्रचंड बेरोजगारीचा प्रश्न उद्भवत आहे. सोबतच औद्योगिक वसाहत निर्माण होणे ही या तालुक्यातील काळाची गरज बनली आहे. त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल अशी आशा देखील व्यक्त केली जात आहे. यातच डाळिंबीचे कोठार म्हणून जगभर प्रसिद्ध असलेल्या सांगोल्यात डाळिंब संशोधन केंद्र होणे देखील गरजेचे आहे.
मेडिकल कॉलेज सुरू करून तालुक्यातील सर्वसामान्य घरातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध देणे आवश्यक आहे. यासह अनेक मुद्द्यानभोवती सध्या ही निवडणूक फिरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या मतदारसंघातून शहाजी बापू पाटील हे पुन्हा विजय होणार ? की या मतदारसंघाला नवीन आमदार मिळणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.