सुहास बाबर यांनी व्हिडिओ कॉलद्वारे गलाई बांधवांशी साधला संवाद 

खानापूर विधानसभा मतदारसंघातील आटपाडीसह विसापूर, खानापूर तालुक्यातील जनतेला कुटुंब मानून अनिलभाऊंनी काम केले. स्वतःपेक्षा इतरांसाठी झटत त्यांनी शेतकऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण केलेला आहे. टेंभूच्या माध्यमातून पाण्याचा गंभीर प्रश्न त्यांनी सोडविला. सहावा टप्पा झाल्याने प्रत्येक गावात अनिल भाऊंच्या माध्यमातून विकास कामे झालेली आहेत. 20 नोव्हेंबर म्हणजे बुधवारच्या दिवशी विधानसभा निवडणुक मतदानप्रक्रिया पार पडणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी खूपच कमी वेळ शिल्लक आहे. खानापूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुहास बाबर यांनी हायटेक प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यांनी मतदारसंघाच्या बाहेरील परराज्यात असणाऱ्या तसेच परगावी असणाऱ्या सोने, चांदी गलाई व्यावसायिक मतदारांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत मतदानाला येण्याचे आवाहन केले. खानापूर मतदारसंघातील शिवसेनेचे सुहास बाबर हे उमेदवार आहेत. या मतदारसंघामध्ये खानापूर तालुक्यासह आटपाडी तालुका व विसापूर सर्कलचा समावेश आहे.

या मतदारसंघातील अनेक मतदार सोने, चांदी, गलाई व्यवसायानिमित्त देशाच्या विविध राज्यांत विखुरले आहेत. या मतदारांना मतदान करण्यास येण्यासाठी सुहास बाबर यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. यावेळी छत्रपती संभाजीनगर येथे स्थित खानापूर, आटपाडी, विसापूर सर्कलमधील गलाई बांधवांनी एकत्रित येऊन महायुतीचे उमेदवार सुहास बाबर यांना पाठिंबा दिला. बैठक सुरू असताना सुहास बाबर यांनी व्हिडिओ कॉल वरून सर्वांशी संवाद साधला. 

यावेळी स्वर्गीय अनिल बाबर यांच्यामुळे टेंभू व इतर योजनांच्या माध्यमातून गावाकडे पाणी आले आहे. आता यापुढील पिढ्यांना स्थलांतर करावे लागणार नाही. त्यामुळे आम्ही आता निश्चिंत आहोत. अनिलभाऊंची परतफेड करण्याची जबाबदारी आता आमच्यावर आहे. या निवडणुकीत सुहास बाबर तुम्ही भरघोस मतांनी विजयी होणारच आहात, अशी भावना गलाई बांधवांनी व्यक्त केली. दिल्ली येथे गलाई बांधवांनी एकत्रित येऊन महायुतीचे उमेदवार सुहास बाबर यांना पाठिंबा दिला आहे. तिथेही बैठक सुरू असताना सुहास बाबर यांनी व्हिडिओ कॉलवरून गलाई बांधवांशी संवाद साधत मतदानाचे आवाहन केले.