आटपाडीत राबविला जाणार का पिंपरी- चिंचवडचा अतिक्रमण मुक्तीचा पॅटर्न

अनेक भागात सध्या खूपच अतिक्रमणाचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ लागल्याने अपघातांच्या प्रमाणातही वाढ होऊ लागली आहे. आटपाडीत देखील हा अतिक्रमणाचा विळखा पहायला मिळत आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील चिखली व कुदळवाडीत झालेल्या अतिक्रमणावर प्रशासनाने अखेर बुलडोझर चालवत ८२७ एकरांवरील बांधकामे जमीनदोस्त केली आहेत. तोच पिंपरी- चिंचवडचा अतिक्रमण मुक्तीचा पॅटर्न आटपाडीत राबविला जाणार का? असा प्रश्न आटपाडीकर आता विचारू लागले आहेत.  आटपाडी शहरातही शेकडो एकर शासकीय जमिनीवर अतिक्रमणे करून टोलेजंग इमारती बांधण्यात आल्या आहेत. तर, काही ठिकाणी ओढापात्र बुजवत मैदाने तयार केली आहेत. राजकीय आश्रयाने झालेल्या अतिक्रमणाला चाप लावण्याचे धाडस केले जाणार का ? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

तर, शहरात बिगरशेती झालेल्या अनेक मालमत्ता या आटपाडी नगरपंचायतकडे अद्याप वर्गच झाल्या नसल्याने तेथील खुल्या जागेचा प्रश्न ऐरणीवर आहे. आटपाडी ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायतमध्ये होऊन दोन वर्षांहून काळ लोटला. नगरपंचायत झाल्यानंतर विकासात्मक अनेक निधी प्राप्त झाला. त्याची कामेही झाली आहेत. दिवंगत आमदार अनिल बाबर, आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर, अमरसिंह देशमुख यांच्या माध्यमातून विकास झाला आहे.

आटपाडी शहर विस्ताताना अगोदर झालेली अतिक्रमणे, होऊ घातलेली अतिक्रमणे ही शहराच्या विकासाला मारक ठरत आहेत. आटपाडीतील काही जागेवर अतिक्रमणे करून घरे बांधण्यात आली आहेत. शहराच्या मुख्य भागातील या जागेची विक्रीही कोट्यवधी रुपयांना नोटरीच्या सहाय्याने करण्यात आली आहे. आटपाडी शहरात महसूल विभाग व सार्वजनिक बांधकाम हद्दीत झालेली अतिक्रमणे काढण्याची जबाबदारी ही त्या विभागाची आहे. नगरपंचायत हद्दीत झालेल्या अतिक्रमणधारकांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर लवकरच कारवाई करण्यात येणार आहे.