इचलकरंजीत मतदारसंघात २२४ जणांनी केले घरामधून मतदान

इचलकरंजी विधानसभा निवडणुकीसाठी ८५ वर्षांवरील तसेच ज्या दिव्यांग व्यक्तींना मतदान केंद्रापर्यंत येणे शक्य नाही, अशा व्यक्तींना घरांमधून मतदानाचा हक्क बाजवण्याची सुविधा निवडणूक आयोगाने केली आहे. त्यानुसार इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामधून ३४ दिव्यांगांनी, तर ८५ वर्षांवरील १९० असे एकूण २२४ मतदारांनी मतदान केल्याची माहिती प्रांताधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली. गृह मतदानासाठी १४ ते १६ नोव्हेंबरपर्यंत मोहीम सुरू ठेवण्यात आली होती.

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये ८५ पेक्षा जास्त वय असलेले एकूण १९७३ मतदार आहेत. त्यापैकी १९४ मतदारांनी तसेच ५४२ दिव्यांग असून, त्यापैकी ३५ मतदारांनी गृह मतदानासाठी इच्छा दर्शवली होती. एकूण २२९ पैकी ३ मतदार मृत आणि २ मतदार परगावी असल्याने २२४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. गृह मतदानासाठी एकूण १४ पथके, दोन राखीव ठेवण्यात आली होती. २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे.

या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून, मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी पथके नेमून विशेष प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार निवडणूक आयोगाने जे मतदार मतदान केंद्रापर्यंत पोहोचू शकत नाहीत आशांचे मतदान घरामधूनच घेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यांच्यासाठी नागरिकांनी १२ डी फॉर्म भरणे बंधनकारक होते.

त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी १४ ते १६ नोव्हेंबरपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल येथे मतदान सुविधा केंद्राची स्थापना केली होती. या मतदान केंद्रात एकूण १४३ मतदार अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.